पिंपरी चिंचवडमध्ये दहा दिवसात आठ खून, 38 वर्षीय महिलेची घरात घुसून हत्या
अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात घुसून धारदार शास्त्राने वार करत महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे. भोसरी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेने पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील हत्यांचे सत्र थांबताना दिसत नाही. गेल्या आठ ते दहा दिवसांत हत्येच्या तब्बल आठ घटना शहरात उघडकीस आल्या आहेत. भोसरी परिसरातल्या धावडे वस्तीमध्ये शनिवारी रात्री उशिरा 38 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली.
नेमकं काय घडलं?
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात धावडे वस्तीमध्ये राहणाऱ्या 38 वर्षीय महिलेची हत्या झाली. कलावती धोंडिबा सुरवार असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात घुसून धारदार शास्त्राने वार करत तिची हत्या केल्याचा आरोप आहे. भोसरी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेने पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. बलात्कार, सामूहिक बलात्कार, खून आणि गँगवॉरच्या घटना वारंवार समोर येत आहेत. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दहा दिवसांत हत्येच्या तब्बल आठ घटना समोर आल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. पण पोलिसांना या घटनांचं खरंच गांभीर्य आहे का? हा चिंतनाचा भाग आहे. कारण या घटनांवर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी अजब दावा केला होता. जोपर्यंत भर चौकात खून होत नाहीत, तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, असा दावा त्यांनी दोनच दिवसांपूर्वी केला होता. कृष्ण प्रकाश यांची दबंग पोलीस अधिकारी म्हणून ख्याती आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश नेमकं काय म्हणाले?
हत्येच्या घटना वाढलेल्या नाहीत, कमीच आहेत. खरंतर हत्या व्हायलाच नको, या मताचा मी आहे. नागरिकांच्या समोर भर चौकात खून होत नाहीत, तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकत नाही. आता झालेल्या हत्येच्या घटना या सामाजिक नाहीत. तसेच शहरात कामगार वस्त्या आणि कामगार भरपूर आहेत. अनलॉकनंतर परराज्यातील नागरिक शहरात आले. त्यांच्यात वाद होत असतात. यातून या घटना घडल्या. त्यामुळे समाजात भीती बाळण्याची गरज नाही. या घटना व्यक्तिश: आहेत, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
हत्येच्या घटना कायद्याच्या भीतीने संपत नाहीत. कायदा माहिती असेल तर भीती असते. रागात असल्यावर लोक मागचा-पुढचा विचार करत नाहीत. राग नसतो तेव्हा कायद्याची भीती वाटते, असंदेखील कृष्णा प्रकाश म्हणाले.
पिंपरी चिंचवडमधील आठवड्याभरातील हत्येच्या घटनांची सविस्तर माहिती
हत्येची पहिली घटना
गेल्या सात दिवसांमधील ज्या सात हत्येच्या घटनांची चर्चा सुरु आहे त्यातील पहिली घटना ही 16 सप्टेंबरला घडली होती. रावेत येथे सौंदव सोमरु उराव नावाच्या सुरक्षा रक्षक महिलेची हत्या करण्यात आली होती. तिने चोराला रोखण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी झालेल्या झटापटीत चोराने महिलेवर हल्ला करत तिचा खून केला होता.
हत्येची दुसरी घटना
पिंपरी चिंचवडमध्ये हत्येची दुसरी घटना ही घोराडेश्वर येथे घडली होती. परिसरात एका नवविवाहितेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. दोन आरोपींनी मृतक महिलेला दर्शनासाठी घोरावडेश्वर डोंगरावर नेले. त्यानंतर तिथे एकाने तिच्यावर जबरदस्ती करत बलात्कार केला. तर दुसऱ्यानेही महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. यावेळी महिलेने प्रतिकार केल्याने आरोपीला संताप आला. त्यातून त्याने पीडितेची निर्घृणपणे हत्या केली.
हत्येची तिसरी घटना
हत्येची तिसरी घटना देखील 20 सप्टेंबरलाच घडली होती. संबंधित घटना ही निगडीतील ओटा स्कीम परिसरात घडली होती. या परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून भीमराव गायकवाड नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती.
हत्येची चौथी घटना
हत्येची चौथी घटना ही 21 सप्टेंबरला चिखली येथे घडली होची. पैशाच्या वादातून आरोपीने वीरेंद्र उमरगी व्यक्तीची हत्या केली होती.
हत्येची पाचवी घटना
विशेष म्हणजे चिखली येथील घटना ताजी असताना त्याचदिवशी हिंजवडीतील सूस या ठिकाणी सुरक्षा रक्षकाच्या हत्येची घटना समोर आली होती. पत्नीबाबत अश्लील कमेंट केल्याने त्याचा खून करण्यात आल्याची माहिती त्यावेळी समोर आली होती.
हत्येची सहावी घटना
हत्येची सहावी घटना ही 22 सप्टेंबरला रावेत येथे घडली होती. रावेतच्या जाधव वस्ती परिसरात राहत्या घरात महिलेची हत्या करण्यात आली होती. खैतनबी हैदर नदाफ असं हत्या झालेल्या महिलेचं नाव होतं. पोलिसांनी केलेल्या तपासात महिलेच्या पतीनेच तिची हत्या केली, अशी धक्कादायक माहिती समोर आली. चारित्र्याच्या संशयावरुन पतीने हे कृत्य केल्याचं उघड झालं आहे.
हत्येची सातवी घटना
हत्येची सातवी घटना ही काल (23 सप्टेंबर) समोर आली होती. संबंधित घटना ही वाकड येथे घडली होती. हत्येमागील नेमकं कारण काय ते समोर आलं नव्हतं. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
पिंपरी-चिंचवडमध्ये भररस्त्यात युवकाची हत्या, आठ दिवसात शहरात खुनाची सातवी घटना