पुण्यात ‘तेलगी 2.0’, तब्बल 86 लाखांच्या बनवाट स्टॅम्पचा घबाड
पुणे शहरात देशपांडे स्टॅम्प व्हेंडर नावाचे कार्यालय आहे. इथूनच देशपांडे कुटुंबीय बनावट स्टॅम्प बनवत होते.
पुणे : पुण्यात बनवाट स्टॅम्पचं प्रकरण उघडकीस आलं आहे. एकूण 86 लाख 38 हजारांचे बनावट स्टॅम्प पेपर जप्त करण्यात आले. बनावट सही-शिक्क्यांचा वापर करत स्टॅम्प पेपरची विक्री करण्यात आली. या प्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांना पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी अटक केली असून, तिघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणे शहरात देशपांडे स्टॅम्प व्हेंडर नावाचे कार्यालय आहे. इथूनच देशपांडे कुटुंबीय बनावट स्टॅम्प बनवत होते. पुणे शहरात दोन ठिकाणी देशपांडे स्टॅम्प व्हेंडर स्टॅम्पची विक्री करत होते.
100 आणि 500 रुपयांचे सुमारे 86 लाख 38 हजार रुपयांचे स्टॅम्प या देशपांडे स्टॅम्प व्हेंडरकडून जप्त करण्यात आले. हे बनावट स्टॅम्प पोत्यांमध्ये बांधून ठेवण्यात आले होते.
देशपांडे स्टॅम्प व्हेंडरचे सर्वेसर्वा असलेल्या आई-वडिलांसह मुलाला आता विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, स्टॅम्पचा तुटवडा असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात देशपांडे स्टॅम्प व्हेंडरकडे स्टॅम्प आले कुठून, याची चौकशी आता पोलिसांनी सुरु केली असून, राज्यातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
देशपांडे स्टॅम्प व्हेंडरच्या मालकाचे नातेवाईक आणि अधिकारी यांची या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे.