नाशिकमध्ये 58 गावांत एक गाव, एकच बाप्पा!
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील तब्बल 58 गावांमध्ये यंदा एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे गावाचे सामाजिक ऐक्यही टिकून शांतता कायम आहे.
नाशिकः नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील तब्बल 58 गावांमध्ये यंदा एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे गावाचे सामाजिक ऐक्यही टिकून शांतता कायम आहे. (Nashik: In 58 villages; one village, one Ganapati)
कोरोनाचे गेल्या दोन वर्षांपासून थैमान सुरू आहे. त्यामुळेही अनेक मंडळे गणपती स्थापन करण्यात पुढाकार घेताना दिसत नाहीत. यंदा येवला शहर पोलीस ठाणे हद्दीतील 19 तर तालुका पोलिस ठाणे हद्दीतील 39 अशा एकूण 58 गावांमध्ये एक गाव, एक गणपती उपक्रम राबविण्यात येत आहे. यात 18 मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळाचा, तर 20 लहान गणेश मंडळाशाचा समावेश आहे. येवला तालुक्यात 2018 मध्ये 72 गावांमध्ये एक गाव, एक गणपती उपक्रम राबविण्यात आला होता. दरम्यान, नाशिकरोडला प्रत्येक प्रभागात विसर्जन रथ ठेवण्यात आला आहे.
गौरीला निरोप
दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी गौरीला निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी दोन दिवसांपासून गौरींच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू होती. गौरीसमोर ठेवण्यासाठी फराळाचे पदार्थ, जेवणासाठी 16 भाज्या करण्यामध्ये महिला वर्गाचा दिवस कसा निघून गेला समजले नाही. दोन दिवस राहिलेल्या गौरींना मंगळवारी भावपूर्ण वातावरणात अनेकांनी निरोप दिला. गौरी सणाच्या निमित्ताने अनेक कुटुंबे एकत्र आली. त्यांनी मोठ्या उत्साहात सण साजरा केला.
गर्दी न करण्याचे आवाहन
दरम्यान, राज्य सरकारने कोरोना महामारीचे संकट अजूनही संपलेले नसल्यामुळे गर्दी करु नये असे नागरिकांना आवाहन केले आहे. मात्र, काही ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे नाशिक पोलिसांनी शहरात आगामी पंधरा दिवस जमावबंदी जारी केली आहे. जमावबंदी लागू केल्यामुळे शहरात एका वेळी पाच जणांना एकत्र येण्यास मज्जाव असेल. तसेच गणेश मंडळात प्रत्यक्षपणे दर्शन घेण्यास तसेच मिरवणुकीलादेखील बंदी असेल. लागू करण्यात आलेल्या जमावबंदीचे आदेश झुगारले तर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
चांदीच्या गणेश मूर्ती
सध्या सराफा बाजारात चांदीच्या गणेश मूर्ती आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. गणेशोत्सव सुरू असल्याने अनेक भाविक चांदीच्या गणेश मूर्तीची खरेदी करायला प्राधान्य देत आहेत. ही गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून कायमस्वरूपी घरात ठेवली जाते. नाशिक चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. चांदीची वेगवेगळ्या प्रकारचे दागिने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
व्यापाऱ्यांत उत्साह
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण व्यापाऱ्यांसाठी सुगीचे दिवस असतात. या काळात मोठी उलाढाल होते. मोठमोठे मॉल, बड्या कंपन्या विविध खरेदीवर ऑफर ठेवतात. नाशकात सध्या छोट्याछोट्या किराणा दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफरचा बार उडवून दिला आहे. त्यात 3000 हजारांची खरेदी केल्यास त्यावर 250 रुपयांचा थर्मास फक्त 100 रुपयांत मिळत आहे. 4500 रुपयांच्या खरेदीवर हॉटपॉट किंवा अप्पे पात्र 209 रुपयांत, 9000 रुपयांची खरेदी केल्यास त्यावर फ्रायपॅन किंवा डोसापॅन 419 रुपयांत मिळत आहे. (Nashik: In 58 villages; one village, one Ganapati)
इतर बातम्याः
नाशिकमधल्या मतदार याद्यांमध्ये घोळ; 2 लाख 87 हजार नावे दुबार