Nashik Omicron| कोरोनाची वावटळ; रुग्णसंख्या 2 हजारांच्या घरात, कारभारी बाहेर पडताना जरा जपून…!
नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 5 हजार 171 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 1 हजार 867 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नाशिकः नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची अक्षरशः सध्या वावटळ आली असून, ती कधी जाणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सध्या जिल्ह्यात दोन हजारांच्या घरात रुग्ण आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 5 हजार 171 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 1 हजार 867 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 763 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
येथे आहेत रुग्ण
उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 65, बागलाण 9, चांदवड 9, देवळा 12, दिंडोरी 73, इगतपुरी 11, कळवण 10, मालेगाव 9, नांदगाव 19, निफाड 70, सिन्नर 33, सुरगाणा 2, त्र्यंबकेश्वर 5, येवला 5 अशा एकूण 332 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 1 हजार 457, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 18 तर जिल्ह्याबाहेरील 60 रुग्ण असून असे एकूण 1 हजार 867 रुग्णांवर उपचार सुरूआहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 15 हजार 801 रुग्ण आढळून आले आहेत. तर नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 14, बागलाण 1, चांदवड 2, देवळा 3, दिंडोरी 18, इगतपुरी 4, कळवण 4, नांदगाव 10, निफाड 20, सिन्नर 7, त्र्यंबकेश्वर 2, येवला 2 असे एकूण 87 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
हे दिवस धोक्याचे
ओमिक्रॉनची भीती आणि कोरोनाचा अतिजलद होणारा संसर्ग पाहता राज्याच्या आरोग्य सचिवांनी महापालिकेला एक पत्र पाठविले आहे. त्यात आगामी पाच दिवस नाशिकरांसाठी अतिधोक्याचे ठरू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. या काळाता कोरोना रुग्णांची संख्या अचानक कितीतरी पटीने वाढू शकते अशी भीती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात 13 लाख 63 हजार नागरिकांपैकी 12 लाख 64 हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यात एकही डोस न घेणाऱ्यांची संख्या 1 लाखाच्या घरात आहे. यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
नियमांची पायमल्ली
नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचे कुठेही पालन केले जात नाही. ओझरमध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदाराने बैलगाडा शर्यत घेऊन हजारो लोकांची गर्दी जमा केली. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ही शर्यत पार पाडली. तोच कित्ता गिरवत दिंडोरी तालुक्यातील लाखमापूर येथेही हजारो जणांची गर्दी जमवून बैलगाडा शर्यत पार पडली. याप्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे नाशिकमध्ये ‘शिवसेना मनामनात शिवबंधन घराघरात’ हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि एका आमदाराच्या मुलाचा विवाह सोहळा झाला. यावेळीही कोरोना नियमांचा फज्जा उडवण्यात आला. हा गाफीलपणा येणाऱ्या काळात भोवण्याची भीती व्यक्त होत आहे.
इतर बातम्याः
Nashik Omicron| सर्व यात्रांवर बंदी, लसीकरण न झाल्यास कटू निर्णय; मंत्री भुजबळांनी काय दिला इशारा?
Nashik Corona| नाशिकमधील शाळा सोमवारपासून बंद; कुठले वर्ग राहणार सुरू?