राष्ट्रवादीची तोफ विधानपरिषदेत धडाडण्याची शक्यता, अमोल मिटकरींना उमेदवारीचे संकेत
विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून दोन नावं (NCP candidates for vidhan parishad election) जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे तरुण नेते अमोल मिटकरी यांचादेखील समावेश आहे.
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून दोन नावं (NCP candidates for vidhan parishad election) जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे तरुण नेते अमोल मिटकरी यांचादेखील समावेश आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावांवर पक्षात एकमत असल्याची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’ला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून शिंदे आणि मिटकरी यांची नावे जवळपास निश्चित आहेत (NCP candidates for vidhan parishad election).
विधानपरिषदेसाठी शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांचे नावं अनेक दिवसांपासून चर्चेत होते. शशिकांत शिंदे यांना माथाडी कामगार नेते म्हणून ओळखले जाते. तर अमोल मिटकरी यांनी विधानसभेच्या निवडणुकीवेळी जोरदार प्रचार केला होता. प्रचारादरम्यान त्यांची भाषणं प्रचंड गाजली होती. पक्षात त्यांचा एक चाहता वर्ग निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी यांचं अनेकदा जाहीरपणे कौतुकही केलं आहे. अखेर त्यांना पक्षाकडून विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी राज्यात 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मते हवी आहेत. आघाडीकडे 173, तर भाजपकडे 115 आमदारांची बेगमी आहे. त्यामुळे आघाडीचे उमेदवार 5 जागी जिंकणार, हे निश्चित आहे. आतापर्यंत शिवसेनेने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीकडून दोन नावे निश्चित झाल्याचं समोर येत आहे.
दुसरीकडे, भाजपला तीन जागा सहज जिंकणे शक्य आहे. अपक्षांच्या साथीने चौथी जागाही भाजपकडेच जाण्याची शक्यता आहे. विधानसभेला संधी न मिळालेले माजी मंत्री एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांची नावं चर्चेत आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची आवश्यक ती काळजी घेऊन निवडणूक घेण्याची सूचना आयोगाने केली आहे.
कोणत्या जागांसाठी निवडणूक
24 एप्रिलला विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त होत आहेत, तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त होत आहेत, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे. 27 मे पूर्वी उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सदनाचे सदस्य होणे बंधनकारक आहे.
संबंधित बातम्या :
भावना दुखावल्या गेल्या, सर्वांची दिलगिरी, संभाजीराजेंच्या मागणीनंतर फडणवीसांकडून दिलगिरी व्यक्त
अमित ठाकरेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी बारा तासात पाळला
…म्हणून मी मास्क लावला नाही, मंत्रालयातील सर्वपक्षीय बैठकीनंतर राज ठाकरेंचं उत्तर
सरकारच्या कामावर समाधानी आहात का? राज ठाकरे म्हणतात….