जळगावच्या गोदावरी रुग्णालयात पावसाचं पाणी शिरलं, रुग्णांची संपूर्ण रात्र रस्त्यावर
मुसळधार पावसामुळे गोदावरी रुग्णालयात पावसाचं पाणी शिरलं (Rain water enters Jalgaon Godavari hospital). त्यामुळे रुग्णांचे रात्रभर प्रचंड हाल झाले.
जळगाव : मुसळधार पावसामुळे काल रात्री गोदावरी रुग्णालयात पावसाचं पाणी शिरलं (Rain water enters Jalgaon Godavari hospital). त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले. विशेष म्हणजे या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरही उपचार सुरु आहे. तरीदेखील आरोग्य यंत्रणा कमी पडताना दिसली. रुग्णालयाच्या तळमजल्यात पूर्णपणे पाणी शिरल्याने या वॉर्डातील रुग्णांना संपूर्ण रात्र रस्त्यावर काढावी लागली (Rain water enters Jalgaon Godavari hospital).
गोदावरी रुग्णालयाच्या आजूबाजूला डोंगर आहेत. काल रात्री जळगावात मुसळधार पाऊस पडला. यावेळी डोंगरावरुन येणारं पाणी रुग्णालयात शिरलं. त्यामुळे गोदावरी रुग्णालयाची वैद्यकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. दरम्यान, रुग्णालयात पाणी शिरल्याने एक व्यक्ती रुग्णाला स्ट्रेरने रुग्णालयातून बाहेर काढत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
विशेष म्हणजे रुग्णालयात पाणी शिरलं असताना पोलीस प्रशासन आणि आरोग्य अधिकारी यांपैकी कुणीही रुग्णालयात आलं नाही. सध्या या रुग्णालयातील पाणी ओसरलं आहे. मात्र, रुग्णालयाची परिस्थिती भयानक आहे. रुग्ण ओरडत आहेत. कुणाची गादी, कपडे तर कुणाचे पैसे ओले झाले आहेत.
जळगावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तेव्हा सुरुवातीला सरकारने या रुग्णालयात फक्त कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, इतर आजारांच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून या रुग्णालयात 50 टक्के कोरोनाबाधित तर 50 टक्के तर इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वॉर्डबॉयची रुग्णांना मदत
मुसळधार पावसामुळे रुग्णालयाच्या तळमजल्यात सर्वत्र पाणी साचलं. मात्र, यावेळी रुग्णालयाच्या वॉर्डबॉय रुग्णांना धीर देत होते. ते जसं जमेल तसं रुग्णांना बाहेर काढत होते. रुग्ण घाबरुन जावू नये याची काळजी घेत होते. मात्र, रात्रभर रुग्णांचे हाल होत असताना एकही डॉक्टर किंवा पोलीस आले नाहीत, अशी तक्रार रुग्णांकडून केली जात आहे.
हे अतिशय भयंकर आहे. रुग्णालयाला नदीच स्वरुप आलं आहे. खरंतय या रुग्णालयाला शासकीय रुग्णालय जाहीर केलं आहे. हे रुग्णालय जळगावपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. सध्या लॉकडाऊनदरम्यान गाड्या, बसची व्यवस्था नाही. त्यामुळे त्याठिकाणी रुग्णालय करु नका, अशी अनेकांची मागणी होती. जळगावचा मृत्यूदर हा देशात सर्वाधिक आहे. कोरोना रुग्णांवर उपचार होत नाही. डॉक्टर, वॉर्डबॉय कमी आहेत. रुग्णाचा मृतदेह आठ दिवस बाथरुममध्ये असतो. हे भयानक आहे – गिरीश महाजन, भाजप नेते
जळगावच्या आरोग्य यंत्रणेचा कारभार याअगोदरही समोर आला आहे. अनेक धक्कादायक प्रकार इथे घडत आहेत. गोदावरी रुग्णालयाचा प्रकार अत्यंत चिंताजनक आहे. पण गोदावरी रुग्णालय हे फार मोठं मेडीकल कॉलेज आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टर आणि अन्य मशिनरी उपलब्ध आहेत. हे रुग्णालय गावाबाहेर आहे. कोरोनाचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून गावाबाहेरील रुग्णालयात उपचार केलं तर अधिक सोयीचं होईल, असा आग्रह अनेकांचा होता. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. याशिवाय आजूबाजूला निवासी असल्यामुळे संसर्गाची भीती असते. लोकांना भीती वाटत असते. जिल्हाधिकाऱ्यांनी उशिरा या रुग्णालयाबाबत निर्णय घेतला. खरंतर रुग्णालय चांगलं आहे. 400 बेड्स आहेत. सर्व सुविधा आहेत. निसर्गाचा कोप आहे. पण असं होऊ शकतं, याचा विचार केला असता तर परिस्थिती नियंत्रणात असती. – एकनाथ खडसे, भाजप नेते
हेही वाचा : कोरोनाबाधित 82 वर्षीय आजीचा मृतदेह 8 दिवस बाथरुममध्ये, जळगाव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार