विदर्भातून विधानपरिषदेसाठी चुरस, जुन्यांना संधी की नव्यांना लॉटरी?
विदर्भातील सात विधानपरिषद आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. या जागांवर आपली वर्णी लागावी म्हणून आतापासूनच रस्सीखेच सुरु झाली आहे (Maharashtra Assembly council members).
नागपूर : विदर्भातील सात विधानपरिषद आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. या जागांवर आपली वर्णी लागावी म्हणून आतापासूनच रस्सीखेच सुरु झाली आहे (Maharashtra Assembly council members). भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या इच्छुकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये, रिपाईचे जोगेंद्र कवाडे, भाजपचे अनिल सोले यांच्यासह सर्वच विद्यमान आमदारांनी पुन्हा संधी मिळावी यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, यावेळी भाजपकडून आशिष देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानपरिषदेत संधी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
विदर्भातील सात विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ जुलै 2020 पर्यंत संपणार आहे. यात शिक्षक, पदवीधर मतदारसंघ, विधानसभा सदस्यांमधून निवड होणारे सदस्य आणि तीन राज्यपाल नियुक्त सदस्यांचा समावेश आहे. या सात जागांसाठी इच्छुकांनी आता भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून मोर्चेबांधणीला सुरु केली आहे. शिवाय विद्यमान आमदारांनीही आपल्याला पुन्हा संधी मिळावी, यासाठी जोराचे प्रयत्न सुरु केले आहेत (Maharashtra Assembly council members). दरम्यान, कुणाला संधी द्यायची आणि कुणाला डावलायचं हे महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांपुढे मोठं आव्हान असणार आहे.
विधानपरिषदेच्या ‘या’ सात सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपणार
सदस्य | मतदारसंघ | कार्यकाळ |
---|---|---|
अनिल सोले, भाजप | पदविधर, नागपूर | जुलै 2020 |
श्रीकांत देशपांडे, अपक्ष | शिक्षक, अमरावती | जुलै 2020 |
हरिसिंग राठोड, काँग्रेस | वि. स. सदस्यांमधून | एप्रिल 2020 |
अरुण अडसड, भाजप | वि. स. सदस्यांमधून | एप्रिल 2020 |
प्रकाश गजभिये, राष्ट्रवादी | राज्यपाल नियुक्त | जून 2020 |
जोगेंद्र कवाडे, रिपाई | राज्यपाल नियुक्त | जून 2020 |
ख्वाजा बेग, राष्ट्रवादी | राज्यपाल नियुक्त | जून 2020 |
सात विधानपरिषद सदस्यांपैकी काहींना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता राजकीय अभ्यासक वर्तवत आहेत. विधानपरिषदेच्या सात जागांपैकी दोन जागा भाजपकडे आहेत. त्यामुळे भाजपकडून पदवीधर मतदारसंघासाठी विद्यमान आमदार अनिल सोले यांची प्रबळ दावेदारी आहे. तर दुसऱ्या जागेसाठी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची जोरात चर्चा आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडूनही इच्छुकांनी प्रयत्न सुरु केले आहेत. राष्ट्रवादीचे प्रकाश गजभिये आणि रिपाईचे जोगेंद्र कवाडे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. या नेत्यांनी पुन्हा संधी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
विधानपरिषद जागांसाठी इच्छुकांनी आपलं ‘मिशन विधानपरिषद’ सुरु केलं आहे. यासाठी मोर्चेबांधणीलाही सुरुवात झाली. मात्र, भविष्यातील राजकीय गणितं बघून या सातही जागांवर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा – तुकाराम मुंढेंचा दणका, उघड्यावर लघुशंका करणाऱ्याला स्वतः पालिका कार्यालयात नेलं