आपके पाँव देखे… मळ साचल्याने पाय झाले काळे? ‘या’ उपायांनी Foot Tanning करा दूर
पायांमध्ये साचलेली घाण आणि धूळ यामुळे ते काळे पडू लागतात. त्वचेमध्ये जमा होणाऱ्या मृत पेशी हे त्यामागचे महत्वाचे कारण असू शकते. घरच्या घरी काही उपाय करून तुम्ही पायांचे टॅनिंग सहज दूर करु शकता.
नवी दिल्ली: तुमचे पाय जर काळे (leg skin tan) पडले असतील आणि चांगले दिसत नसतील तर तुमचा संपूर्ण लूक बिघडू शकतो. पायांमध्ये साचलेली घाण आणि धूळ यामुळे ते काळे पडू लागतात. त्वचेमध्ये जमा होणाऱ्या मृत पेशी (dead skin) हे त्यामागचे महत्वाचे कारण असू शकते. तुम्हालाही फुट टॅनिंगची (feet tanning) समस्या आहे का ? तसे असेल तर घरच्या घरी काही उपाय करून तुम्ही टॅनिंग कमी करू शकता. पेडिक्युअरशी संबंधित काही घरगुती उपाय करून पहा.
लिंबू आणि बटाटा
व्हिटॅमिन सी युक्त लिंबामुळे त्वचेची रंग उजळतो आणि त्यासह बटाट्याचा वापर केल्यास दुप्पट फायदा मिळू शकतो. एका भांड्यात बटाट्याचा आणि लिंबाचा रस घ्या, तो नीट मिसळा. आता हे मिश्रण टॅनिंग झालेल्या त्वचेवर लावावे. वाळल्यानंतर थोड्या वेळाने ते धुवून टाकावे. नियमितपणे याचा वापर केल्यास महिन्याभरात फरक दिसू लागेल.
बेसन आणि दही
या दोन्ही घटकांमध्येही त्वचेचा रंग सुधारण्याचे गुणधर्म आहेत. चण्याच्या पीठ म्हणजेच बेसनाचा उपयोग देशी उटणे म्हणून केला जातो. एका वाटीत थोडे दही घेऊन त्यात बेसन घालून मिक्स करावं आणि ते पायाच्या त्वचेवर लावून ते वाळू द्यावं. त्यानंतर थोडं गुलाबपाणी घेऊन पायांना मसाज करा. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करावा.
ओट्स आणि दही
त्वचेचा रंग सुधारण्यासाठी, ती एक्सफोलिएट केली पाहिजे. त्यासाठी रात्री ओट्स भिजवून ठेवा व सकाळी त्यामध्ये दही घाला. ते नीट मिक्स करून त्वचेवर लावावे आणि नीट स्क्रब करा. मात्र जास्त वेळ घासू नका, केवळ 5 मिनिटे ही कृती करावी. आठवड्यातून 2 वेळा हा उपाय करावा. थोड्याच दिवसात फरक दिसून येईल.
कॉफी आणि मध
स्किन केअर रुटीनमध्ये लोकं कॉफीमध्ये थोडा मध मिसळून त्याचा स्क्रबप्रमाणे वापर करतात. पायांसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. पायाचे टॅनिंग घालवायचे असेल तर हा स्क्रब वापरून पहा. त्यासाठी थोड्या कॉफी पावडरमध्ये मध मिसळून पायांवर लावावे व थोडा वेळ चोळावे. यामुळे टॅनिंग दूर होण्यास मदत होते.