Diabetes Care : रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्या ‘ही’ 5 डिटॉक्स ड्रिंक्स
मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशावेळी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही अनेक पद्धतीच्या डिटॉक्स ड्रिंक्सचा आहारात समावेश करु शकता.
बदलती, व्यस्त जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी, पुरेश्या झोपेचा अभाव, नियमित व्यायाम न करणे, कमी शारीरिक हालचाल या सर्वांचा परिणाम आपल्या (health care) आरोग्यावर होत असतो. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा (health problems) सामनाही करावा लागू शकतो. त्यामधीलच एक आहे मधुमेह (Diabetes) हा आजार. मधुमेह झालेल्या व्यक्तींना स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते. तसेच खाण्या-पिण्याचेही पथ्य पाळावे लागते. रक्तातील साखर नियंत्रणात (Blood sugar) राहील अशा पदार्थांचा आहारा समावेश करावा लागतो. अशा परिस्थितीत मधुमेहाचे रुग्ण रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक पद्धतीच्या डिटॉक्स ड्रिंक्सचा (Detox Drinks) आहारात समावेश करु शकतात. ही डिटॉक्स ड्रिंक्स घरच्या घरी सहज, सोप्या पद्धतीने बनवता येतात. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्साठी कोणत्या हेल्दी, डिटॉक्स ड्रिंक्सचा आहारात समावेश करू शकतो याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
तुळशीचे डिटॉक्स ड्रिंक
तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच त्यामध्ये हायपोग्लायकेमिक गुणही असतात. त्यामुळे ब्लड शुगर एका ठराविक पातळीपर्यंत राहते, वाढत नाही. हे डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात तुळशीची 6 ते 8 पाने घालावीत. हे पाणी चांगले उकळून घ्यावे. ते पाणी गार झाल्यानंतर त्याचे सेवन करावे. नियमितपणे हे डिटॉक्स ड्रिंक प्यायल्यास फरक दिसून येईल.
आल्याचे डिटॉक्स ड्रिंक
आलं हे आपल्या तब्येतीसाठी खूप चांगले, फायदेशीर आहे. त्यामध्ये ॲंटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. तसेच ॲंटी-इन्फ्लेमेटरी गुणही असतात. आल्याचे डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्यावं. नंतर त्यामध्ये थोडं आलं घालावं. हे पाणी चांगलं उकळू द्यावं. गार झाल्यानंतर पाणी गाळून घ्यावं आणि त्याचं सेवन करावे. हे डिटॉक्स ड्रिंक मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असते.
मेथी डिटॉक्स ड्रिंक
मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथी खूप फायदेशीर असते. त्याचे डिटॉक्स बनवण्यासाठी थोडे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी उठल्यावर ते पाणी गरम करून चांगले उकळावे. थंड झाल्यावर ते गाळून पाणी सेवन करावे.
दालचिनी डिटॉक्स ड्रिंक
दालचिनी ही सुद्धा मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगली असते. हे डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा दालचिनी पावडर घालून रात्रभर ते मिश्रण तसेच ठेवावे. सकाळी उठल्यावर हे पाणी प्यावे. दालचिनीमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
कडुलिंब डिटॉक्स ड्रिंक
कडुलिंबाचे पाणी पिणे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर हे एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. कडुलिंबाच्या पानांमध्ये ॲंटी-इन्फ्लेमेटरी तसेच ॲंटी-व्हायरल गुणधर्म असतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. कडुलिंबाचे डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात 7 ते 8 कडुलिंबाची पाने घालून ते पाणी उकळावे. त्यानंतर हे पाणी प्यावे. याची चव जरी कडू असली तरी आरोग्याच्या दृष्टीने ते खूपच फायदेशीर असते.