पुणेः एक धडकी भरवणारी बातमी. पुण्यात आठवड्यात तब्बल 15 हजार कोरोना रुग्णांची वाढ झाल्याचे समोर आले असून, दिवसाला चक्क 4 हजारांच्या पुढे रुग्ण सापडत आहेत. अशीच गती राहिली, तर ही लाट आटोक्यात येणार कशी आणि कुणा-कुणाला कोठे-कोठे उपचार मिळणार याची कल्पना करूनच अंगावर काटा येण्याची परिस्थितीय. आता फक्त या लाटेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसारखा हाहाकार माजवू नये, असाच आशावाद साऱ्यांच्या मनात असेल. जाणून घेऊ या पुण्यात कोरोनाची वाटचाल कशी सुरूय. त्यामुळे नागरिक थोडेफार जागरूक झाले तर बरेच.
10 जणांचा मृत्यू
पुण्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आजपर्यंत बाधितांची संख्या तब्बल 5 लाख 26 हजार 35 वर गेलीय. सध्या पुण्यात 14 हजार 890 सक्रिय कोरोना बाधित आहेत. त्यात रविवारी म्हणे 18 हजार 12 जणांची चाचणी करण्यात आली. त्यात तब्बल 4 हजार 29 नवे बाधित सापडले. दिवसभरात तिघांचा मृत्यूही झाला. आठवड्यात दहा जणांचा मृत्यू झालाय, तर काल कोरोनातून 688 जण बरे झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, नागरिकांनी काळजी करण्याऐवजी स्वतःची काळजी घ्यावी. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
एक दिलासा काय?
पुण्यात झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत असले तरी एक दिलासा आहे. तो म्हणजे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे समोर आले आहे. रविवारपर्यंत जरी पंधरा हजारांच्या घरात सक्रिय रुग्ण असले, तरी रुग्णालयात उपचार घेण्याची संख्या अतिशय कमी म्हणजे फक्त 5.48 टक्के आहे, असे महापालिकेच्या अहवालात सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता कोरोनाचा प्रसार जरी वेगाने होत असला, तरी रुग्ण गंभीर होण्याचे आणि त्याचा मृत्यू होण्याचे प्रमाण अतिशय कमी होत आहे. हा एक दिलासाच म्हणावा लागेल.
प्रशासन म्हणते…
पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मात्र, रुग्णालयात भरती होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. हे ध्यानात घेता नागरिकांनी मास्क वापरावा. सुरक्षित अंतराचे पालन करावे. लसीकरण करून घ्यावे आणि कोरोनापासून स्वतःचे कुटुंब स्वतःच दूर ठेवावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अन्यथा कोरोना निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करू, असा इशारा देण्यात आला आहे.
आठवड्यातील चित्र असे…
तारीख – चाचण्या – रुग्ण – बरे – मृत्यू
3 जानेवारी – 6573 – 444 – 120 – 0
4 जानेवारी – 6819 – 104 – 151 – 1
5 जानेवारी – 13443 – 1805 – 131 – 0
6 जानेवारी – 15775 – 2284 – 80 – 3
7 जानेवारी – 18086 – 2757 – 628 – 2
8 जानेवारी – 19186 – 2471 – 711 – 2
9 जानेवारी – 18012 – 4029 – 688 – 2
एकूण – 97894 – 14894 – 2509 – 10
Nashik new corona restrictions| आजपासून नवे निर्बंध; 45 हजार हेल्थ वर्कर्सना प्रिकॉशन डोस
Nashik Planning: नाशिकच्या योजनांसाठी 807.86 कोटींची आर्थिक मर्यादा; काय आहे यंदाचे नियोजन?