उद्धव ठाकरे यांचे शिलेदार अद्वय हिरे यांना का झाली अटक? काय आहे फसवणुकीचे प्रकरण
advay hire and uddhav thackeray | शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांना बुधवारी रात्री अटक झाली. त्यांना एका फसवणूक प्रकरणात अटक झाली. या अटकेमुळे उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काय आहे हे प्रकरण आणि अद्वय हिरे यांचे नाशिक जिल्ह्यात काय आहे महत्व...
नाशिक | 16 नोव्हेंबर 2023 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना बुधवारी रात्री भोपाळमध्ये अटक झाली. आठ वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रकरणात त्यांना अटक झाली. अद्वय हिरे यांना अटक ही उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये कोंडी करण्यासाठी आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. रेणुका सूतगिरणी प्रकरणात फसवणुकीच्या आरोपाखाली अद्वय हिरे यांना अटक झाली आहे. या गिरणीसाठी साडेसात कोटी कर्ज घेतले होते. हे कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अद्वय हिरे यांना अटक केल्यानंतर हिरे समर्थकांनी पोलिसांच्या गाडीसमोर गोंधळ घातला. यामुळे पोलिसांनी अद्वय हिरे यांना मालेगावच्या बाहेर नासिकमध्ये पोलीस ठाण्यात रात्रभर ठेवले होते.
काय आहे नेमके प्रकरण
रेणुका सूतगिरणीकडून (Renuka Mill) साडेसात कोटी कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने 30 कोटींच्यावर रक्कम गेली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र अद्वय हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचे कट्टर विरोधक मानले जातात. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता.
आठ वर्ष जुनी केस
जिल्हा बँकेची रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्थेवर 32 कोटींची थकबाकी आहे. कर्ज घेताना बँकेची दिशाभूल करुन कर्ज घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मालेगाव तालुक्यात असलेल्या रमझानपुरा पोलिसांत 29 जणांविरोधात फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यंत्रमाग प्रकल्पासाठी बोगस दस्तऐवज दाखवून कर्ज घेतल्याचा आरोप आहे. हे प्रकरण आठ वर्ष जुने आहेत. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु होती.
अद्वय हिरे आहेत कोण
अद्वय हिरे यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते भाजपमध्ये होते. शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर दादा भुसे शिंदे गटासोबत राहिले. यामुळे उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांना ठाकरे गटात घेऊन दादा भुसे यांना पर्याय देण्याचा प्रयत्न केला. दादा भुसे यांचे कट्टर विरोधक ते आहेत. त्यांना शिवसेनेचे उपनेते करण्यात आले. त्यांनी नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे.
काय म्हणतात संजय राऊत
संजय राऊत यांनी हिरे यांची अटक राजकीय असल्याचा दावा केला. त्यांच्यावरील आरोप ते भाजपमध्ये असतानाही होते. दादा भूसे यांच्यावरही गिरणा सहकारी साखर कारखान्यात घेटाळा केला आहे. आम्ही रितसर त्यासंदर्भात तक्रार केली आहे. हसन मुश्रीफ यांनी संताजी घेरपडे साखर कारखान्यात घोटाळा केला आहे. परंतु अद्वय हिरे यांनी मालेगावमध्ये विधानसभा लढवू नये, यासाठी त्यांना त्रास दिला जात आहे. आता २०२४ ला पोलिसांचा हिशेब केला जाईल.