अजित पवार मुख्यमंत्री होणार का? दीपक केसकर यांनी केले महत्वाचे वक्तव्य
deepak kesarkar on ajit pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्ते, आमदार आणि मंत्र्यांकडूनही अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा जाहीरपणे व्यक्त केली आहे. रविवारी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आता दादांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा जाहीरपणे व्यक्त केली. यावर शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसकर यांनी मत मांडले.
महेश सावंत, सिंधुदुर्ग | 5 नोव्हेंबर 2023 : राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक जण आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना अजित पवार यांच्याबरोबर सुप्रिया सुळे यांचे नाव भावी मुख्यमंत्री घेतले जात होते. त्यासंदर्भात बॅनर्सही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावले होते. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत शिवसेना-भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. सरकारमध्ये गेल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार आणि मंत्र्यांनी अनेक वेळा अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वत: अजित पवार यांनीही ती अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी आज जाहीरपणे दादांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा मांडली. त्यावर शिवसेनेचे नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसकर यांनी मत मांडले.
काय म्हणाल्या होत्या आशाताई पवार
राज्यातील जनतेने अजितदादांना भरभरुन प्रेम दिले. बारामतीमधील जनताही नेहमी पाठिशी राहिली आहे. आता माझे वय ८६ झाले आहे. माझ्या देखतच दादाने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, हीच शेवटची इच्छा आहे, असे आशाताई पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रत्येक आईला आपला मुलगा उच्चपदावर जावा ही इच्छा असते. त्यात चुकीचे काहीच नाही, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून आल्या. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्रीपदाची इच्छा करणे त्यात गैर काहीच नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, प्रत्येक मातेला आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. त्यात चुकीचे काहीच नाही.
काय म्हणाले दीपक केसकर
मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आणि आकांक्षा असण्यामध्ये काही चुकीच नाही. परंतु एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. आगामी निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार आहे. अजित दादा यांचे वय लहान आहे. त्यांना नक्कीच पुढच्या काळात मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते. अशा शब्दात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.