उद्याच्या बैठकीआधीच अजित पवारांनी बातमी फोडली, दिल्लीत उद्या नेमकं काय ठरणार? वाचा Inside Story
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. महायुतीत पुढच्या दोन दिवसांत काय-काय घडामोडी घडतील, याबाबत त्यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या घडामोडी आता अंतिम टप्प्यात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. महाराष्ट्राचे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्रीपदाबाबतचा दावा सोडला. महायुतीच्या मुख्यमंत्र्यांना आपला पूर्ण पाठिंबा असेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानत त्यांच्या कामांचं कौतुक केलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर आता पुढच्या दोन दिवसांत काय घडामोडी घडतील? याबाबतचा पूर्ण तपशिलच सांगून टाकला आहे.
“मी महाराष्ट्राच्या तमाम मतदार आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आमच्यावर जबाबदारी वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. एकंदरीतच उद्या आम्ही तीनही जण दिल्लीला जाणार आहोत. तिथे आमची सर्व पुढची चर्चा होईल. त्यानंतर नवीन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, सरकार अस्तित्वात येतील”, अशी महत्त्वाची माहिती अजित पवारांनी दिली. “उद्या 28 तारीख आहे. येत्या 30 तारेखेपर्यंत किंवा 1 डिसेंबरपर्यंत शपथविधीचा कार्यक्रम व्हायला पाहिजे”, असं देखील अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.
‘अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होणार’
“लगेचच नागपूरचे हिवाळी अधिवेशन आहे. पुरवणी मागण्या मंजूर करुन घ्याव्या लागतील. कामाचा लगेचच प्रेशर राहणार आहे. पण आम्ही बहुतेक जण अनुभवी असल्यामुळे तितकी काही अडचण येईल, असं आम्हाला वाटत नाही. चांगल्या पद्धतीने राज्याचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न आहे. समाजातील सर्व घटकांना बरोबर नेण्याचा प्रयत्न आहे. तसेच केंद्र सरकारकडून मोठा निधी आणण्याचा प्रयत्न आहे. लोकसभेचं अधिवेशन सुरु असल्यामुळे मी तिथे प्रमुखांना भेटण्याचाही प्रयत्न करणार आहे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात महायुतीचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरेल. उद्याच्या चर्चेनंतर त्याला अंतिम स्वरुप येईल. उद्याच्या निर्णयाला सर्वांचा पाठिंबा असेल”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
अजित पवार मुख्यमंत्री होणार?
यावेळी अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटत असल्याचं सांगण्यात आलं. त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर “कार्यकर्त्यांना काहीही वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली, कुणाचे किती लोकं निवडून आले, याबाबतही पाहिलं जातं. मागच्या अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी आहे. आताची गोष्ट वेगळी आहे”, असं अजित पवार यांनी उत्तर दिलं.
अजित पवार ईव्हीएमबद्दल काय म्हणाले?
“आपण सर्वजण न्याय व्यवस्थेला महत्त्व देतो. सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की, प्रत्येक वेळेस निवडणुकीत ज्यांचा पराभव होतो तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो, आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं. आता मागे देखील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आमचा अतिशय खराब परफॉर्मन्स पाहिला. पण आम्ही त्याला ईव्हीएमचा दोष दिला नाही. ईव्हीएम काही आज नाही, वर्षानुवर्षे ईव्हीएम चालू आहे. आपल्या स्वत:च्या कार्यकर्त्याचं मनोधैर्य वाढवण्याकरता पराभूत उमेदवारांना आपले नेते, वरिष्ठ काहीतरी करतात हे दाखवणं गरजेचं असतं. त्यामुळे हा केविलवाणा प्रयत्न आहे”, अशी टीका अजित पवार यांनी केली.
“आता पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, कर्नाटक, केरळ, तेलंगणाचा, जम्मू-काश्मीरचा निकाल लागला तेव्हा ईव्हीएम फर्स्ट क्लास आणि निकाल विरोधात गेला की ईव्हीएम खराब. 2014 ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट आली होती. त्यावेळेस देखील ईव्हीएमबद्दल काही लोकं बोलली. 2019 च्या निवडणुकींवेळीदेखील काही लोक बोलली. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर कुणी ईव्हीएमबद्दल काही बोललं नाही. हे बरोबर नाही”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
“शेवटी हे काही एका दिवसात घडत नसतं. ईव्हीएम मशीन बद्दल जगातील कोणत्याही देशाचे दाखले द्यायचे, अमेरिकेत बॅलेट पेपर वापरला जातो म्हणे. पण डोनाल्ड ट्रम्प गेल्या निवडणुकीत पराभवी झाले. पण या निवडणुकीत जिंकून आले. या गोष्टी घडत असतात. कुणीही कोणत्याही प्रकारचे आले तरी काही हरकत नाही. सुप्रीम कोर्ट देतील तो निर्णय अंतिम मानतो. त्यांनी सांगितलं, ईव्हीएम बरोबर आहे. त्या लोकांचा दारुण पराभव झाला आहे. ते कुणाच्या तरी माथी मारायचं म्हणून ईव्हीएमचं नाव घेत आहेत आणि जवळच्या कार्यकर्त्यांसमोर केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. बहुतेकांचा ईव्हीएमवर विश्वास आहे”, असं अजित पवार म्हणाले.