लाडकी बहीण योजनेचे या पठ्याने बायकोचे वेगवेगळ्या नावाने २८ अर्ज भरले, मग काय…अजित पवार यांनी सांगितला किस्सा
mukhyamantri ladki bahin yojana: अजित पवार यांनी आपल्या भाषणात एका व्यक्तीचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, माझ्या सातारा जिल्ह्यात एक पठ्या निघाला. त्याने आपल्या बायकोच्या नावाने २८ अर्ज भरले. प्रत्येक अर्जावर वेगवेगळे फोटो लावले. त्याचा हा प्रकार लक्षात आला. मग...
mukhyamantri ladki bahin yojana: राज्यात लाडकी बहीण योजनेची चर्चा सर्वाधिक सुरु आहे. या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी काय, काय प्रकार होताय? त्याचे किस्सेही अधूनमधून समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगरातील कन्नड तालुक्यात १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचे अर्ज पुरुषांनी भरल्याचे समोर आले होते. त्यापेक्षा वेगळा प्रकार सातारामध्ये घडला. त्यासंदर्भातील किस्सा अजित पवार यांनी भाषणात सांगितला. एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीच्या नावाने २८ अर्ज भरले, असे अजित पवार यांनी सांगितले.
दीड हजारांची किंमत काय कळणार?
राज्यात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचे श्रेय शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे. त्यानंतर माझा नंबर लागतो. मी आत्तापर्यंत १० अर्थसंकल्प मांडले आहेत. पण मी अर्थसंकल्प मांडताना पहिल्या स्थानावर महिलांना ठेवले आहे. कारण महिला खूप कष्ट करतात. त्या आपल्या कुटुंबाचा पहिला विचार करतात. काही लोक दीड हजार रुपयांच्या संदर्भात चेष्ठा करतात. पण जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत त्यांना दीड हजारांची किंमत काय कळणार? असा टोला अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा विरोध करणाऱ्या विरोधकांना लगावला.
एकाने भरले २८ अर्ज
अजित पवार यांनी आपल्या भाषणात एका व्यक्तीचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, माझ्या सातारा जिल्ह्यात एक पठ्या निघाला. त्याने आपल्या बायकोच्या नावाने २८ अर्ज भरले. प्रत्येक अर्जावर वेगवेगळे फोटो लावले. त्याचा हा प्रकार लक्षात आला. मग आता चक्की पिसींग पिसींग पिसींग… आता आम्ही या योजनेची मुदत वाढवली आहे. आता या योजनेसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका
लाडकी बहीण योजना आपल्याला पुढे चालू ठेवायची असेल तर घड्याळ्याच बटण दाबाव लागेल. ही योजना बंद करण्यासाठी विरोधकांचा एक माजी मंत्री हा कोर्टात गेला आहे. विदर्भातील एक माणूस बोलतो की ही योजना बंद झाली पाहिजे. या विरोधकांच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका.मला अनेक महिला येऊन राख्या बांधतात. त्यामुळे मी शपथ घेऊन सांगतो की राज्यातील महिलांच्या सर्वांगीण विकास आणि रक्षणासाठी मी शेवटपर्यंत काम करात राहीन. हा अजित दादाचा वादा आहे. मी नवखा नाही, मी १० उन्हाळे आणि पावसाळे अधिक पाहिले आहेत.
३ गॅस सिलेंडरचे पैसे थेट खात्यात
महिलांना ३ गॅस सिलेंडरचे पैसे थेट खात्यात येणार आहे. मुलींना मोफत शिक्षणाची सोय देखील केली आहे. गरीब घरातल्या मुली देखील उच्चशिक्षण होणार आहेत. लेक लाडकी बहीण योजना देखील आम्ही आणली आहे. त्यात मुलगी जन्माला आल्यापासून त्या मुलीला टप्प्याटप्याने १ लाख रुपये खात्यात जमा होणार आहे.
महिलांसंदर्भात दुष्कृत्य करणाऱ्या लोकांना फक्त जन्मठेप किंवा फाशी व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संविधानाने प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार दिला आहे, पण बोलताना तुम्ही कोणत्या धर्मावर अपेक्षार्ह बोलत असाल तर चुकीच आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेतला पाहिजे. कुणी वेडे वाकडे प्रयत्न केले तर त्याला कायदा बघून घेईल पण आपण सामाजिक सलोखा टिकवला पाहिजे हे कोणी विसरला नको, असे नितेश राणे यांचे नाव न घेता अजित पवार यांनी म्हटले.
हे ही वाचा…