महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत, तब्बल ‘इतक्या’ आमदारांचा शिंदे गटात होणार पक्षप्रवेश?
महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) आगामी काळात खूप मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिले आहेत.
अमरावती : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) आगामी काळात खूप मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी दिले आहेत. बच्चू कडू यांनी आज आगामी काळातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खूप मोठं विधान केलं आहे. आगामी काळात शिवसेनेचा ठाकरे गट (Thackeray Group) वगळता तब्बल 10 ते 15 आमदारांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलाय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील आगामी काळातील घडामोडींकडे महाराष्ट्रासह देशभरातील जनतेचं लक्ष वेधलं जाण्याची शक्यता आहे.
“ठाकरे गट वगळता आगामी काळात दुसऱ्या पक्षातील 10-15 आमदारांचा पक्ष प्रवेश होऊ शकतो. 20-25 आमदार जरी इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने पूर्ण काळ पूर्ण करेल”, असा दावा बच्चू कडू यांनी केलाय. हा पक्षप्रवेश फक्त शिंदे गटच नव्हे तर भाजपातही होऊ शकतो, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
“पक्ष प्रवेश आणि न्यायालयामुळे तारीख वर तारीख येत आहे. पुढील 15 दिवसात अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होईल”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होऊन आता आठ महिने होत आले आहेत. पण अद्यापही मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. विशेष म्हणजे मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन शिंदे गटाच्या नेत्यांनी याआधीदेखील नाराजी व्यक्त केलीय. स्वत: बच्चू कडू यांनी दोन-तीन वेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन नाराजी व्यक्त केलीय.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल प्रश्न विचारला असता ते मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं सांगतात. पण त्यांच्याकडून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख सांगितली जात नाही. त्यामुळे विरोधकांकडून हे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका केली जाते.
…तर शिंदे सरकार कोसळेल?
शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटातील वादावर सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगात याबाबतची सुनावणी पूर्ण झालीय. निवडणूक आयोग याप्रकरणी कधीही अंतिम निकाल जाहीर करु शकतो.
दुसरीकडे सुप्रीम कोर्टातही या प्रकरणात 14 फेब्रुवारीपासून नियमित सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीत 16 आमदारांच्या अपात्रतेच्या विषयाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर महाराष्ट्रातील सरकार कोसळण्याची शक्यता आहे.