बच्चू कडू इरेला पेटले… नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार ठरला?, कोण लढणार?; नाव आलं समोर
माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यानंतर अमरावतीवर दावा करणारे नवनीत राणा यांचा प्रचार करतील. त्यात काही शंकाच नाही. आगामी काळात अनेक बदल झालेले दिसतील, असं रवी राणा यांनी सांगितलं.
अमरावती : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. आम्ही भाजप-शिंदे गटाकडे या मतदारसंघाची मागणी करू. त्यांनी मतदारसंघ नाही सोडला तर आम्ही आमचा उमेदवार देऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढवू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांच्या या घोषणेमुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना टेन्शन आलं आहे. बच्चू कडू यांनी उमेदवार दिल्यास राणा यांना पराभवाला सामोरे जावं लागू शकतं, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मात्र, जे उमेदवार देण्याची भाषा करत आहेत, तेच आमचा प्रचार करायला येतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. राणा यांचं हे विधान ताजं असतानाच एक नवी माहितीसमोर आली आहे. त्यामुळे राणा यांची डोकेदुखी वाढणार आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात खासदार नवणीत राणा यांच्या विरोधात प्रहारचा उमेदवार ठरला असल्याचं सांगितलं जात आहे. नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांच्या प्रहारकडून रवींद्र वैद्य संभाव्य उमेदवार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. खासदार राणा यांना आव्हान देण्यासाठीच प्रहारने जोरदार तयारी केल्याचं सांगितलं जात आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघावर बच्चू कडू यांनी दावा ठोकल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे राणा विरुद्ध कडू वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
थोडक्यात पडलो
बच्चू कडू यांनी कालच आपली भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही विधानसभेच्या 15 ते 20 जागा लढवणार आहोत. तशी मागणी युतीकडे केली जाईल. तसेच अमरावती लोकसभाही लढवणार आहोत. त्याचीही मागणी युतीकडे करू. त्यांनी जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्ही स्वबळावर लढणार आहोत. पण अमरावती लढणार आहोत. अमरावती लोकसभा मतदारसंघात मी उभा होतो. अवघ्या 5 हजार मतांनी मी पडलो होतो. कोणत्याही राजकीय पक्षांचं कोणतंही समर्थन नसताना माझा थोडक्यात पराभव झाला होता. म्हणूनच आम्ही या मतदारसंघात आमचा उमेदवार देणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
बच्चू कडू यांचं अभिनंदन
त्यानंतर आमदार रवी राणा यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. दावे अनेकजण ठोकतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अंतिम निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आमच्या मागे ताकदीने उभे आहेत. बच्चू कडू यांना दिव्यांग महामंडळ मिळालं त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना चांगलं महामंडळ मिळाल्याने ते चांगलं काम करतील, असा चिमटा रवी राणा यांनी काढला होता.