‘दिवा विझतो तेव्हा तो फडफड करतो’, रवी राणांचा सर्वात खोचक निशाणा
'दिवा विझतो तेव्हा तो फडफड करतो', अशी खोचक टीका रवी राणा यांनी केली आहे.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील दोन आमदारांमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. रवी राणा यांनी ट्विट करत बच्चू कडूंवर नाव न घेता निशाणा साधलाय. ‘दिवा विझतो तेव्हा तो फडफड करतो’, अशी खोचक टीका रवी राणा यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे बच्चू कडू पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी याआधीच रवी राणा यांना 1 ऑक्टोबरपर्यंत केलेल्या आरोपांप्रकरणी पुरावा सादर करण्यास सांगितलं आहे. अन्यथा सात ते आठ आमदार आपल्या संपर्कात असून सरकारमधून बाहेर पडू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. पण त्यांच्या या इशाऱ्यानंतर रवी राणा यांनी खोचक टीका केली आहे.
रवी राणा यांनी ट्विटवर आपली भूमिका मांडली आहे. “दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला ‘हा’ एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला ‘हा’ फुसका फटाका आहे”, अशा खोचक शब्दांमध्ये रवी राणा यांनी टीका केली आहे.
दिवा जेव्हा विझतो तेव्हा तो फडफड करतो, त्यातला ‘हा’ एक दिवा आहे, दिवाळीत खूप फटाके फुटले त्यातला ‘हा’ फुसका फटाका आहे
— MLA Ravi Rana (@mlaravirana_ysp) October 27, 2022
विशेष म्हणजे रवी राणा यांच्याआधी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनीदेखील बच्चू कडू यांना उद्देशून महत्त्वाचं विधान केलं आहे. “आता कुणाच्या संपर्कात कोण आहे, कुणी संपर्कात असेल तर त्यांना लगेच पक्षप्रवेश द्या. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत”, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं. त्यानंतर रवी राणा यांनी ट्विटरवर नाव न घेता बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी बच्चू कडू यांना सरकारमधून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. बच्चू कडू जे बोलतात तेच करतात. त्यामुळे येत्या 1 तारखेला ते आठ आमदारांसह सरकारमधून बाहेर पडतील, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
बच्चू कडू यांच्याकडे सर्वसामान्य नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून पाहिलं जातं. बच्चू कडू हे त्यांच्या डॅशिंग कामाच्या पद्धतीमुळे प्रसिद्ध आहेत. ते ठाकरे सरकारच्या काळात राज्यमंत्री होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली त्यावेळी ते देखील बंडखोर आमदारांसह सूरत आणि त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. बच्चू कडू यांना नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदाची अपेक्षा होती. पण राज्य सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळालं नव्हतं. त्यानंतर त्यांना दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण सरकार स्थापन होऊन तीन महिने पूर्ण झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यामुळे बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा होती. या दरम्यान आमदार रवी राणा यांनी सरकारला पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू यांनी खोके (पैसे) घेतल्याचा आरोप केला होता.
रवी राणा यांच्या आरोपांनंतर बच्चू कडू आक्रमक झाले. विरोधकांकडून 50 खोके, एकदम ओक्के, अशी टीका केली जात असताना सरकारमधील आमदाराकडूनही तशी टीका केली जात असल्याने कडू संतापले. राणा यांच्या टीकेने इतर सात ते आठ आमदारही नाराज झाल्याची माहिती बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. तसेच रवी राणा यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर केले नाहीत तर सरकारमधून बाहेर पडू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.