शिक्षक अक्षरश: ढसाढसा रडला, अमरावतीतला मन सुन्न करणारा VIDEO
नाशिकमध्ये एक शिक्षक जुन्या पेन्शन योजनेवर बोलताना ढसाढसा रडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु व्हावी यासाठी त्याने आक्रमक पद्धतीने भूमिका मांडली.
अमरावती : अमरावतीत शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत (Amravati MLC Election) धीरज लिंगाडे (Dhiraj Lingade) आघाडीवर आहेत. धीरज यांनी मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीतही आघाडी घेतली. पण अजूनही अंतिम निकाल समोर आलेला नाही. दरम्यान, नाशिकमध्ये एक शिक्षक जुन्या पेन्शन योजनेवर बोलताना ढसाढसा रडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु व्हावी यासाठी त्याने आक्रमक पद्धतीने भूमिका मांडली. यावेळी बोलताना शिक्षकाला अश्रू अनावर झाले. संबंधित शिक्षक ढसाढसा रडला. शिक्षकाने हंबरडा फोडलेला पाहून तिथे उपस्थित इतर शिक्षकांनादेखील अश्रू अनावर झाले.
“एक शिक्षक तीन वर्षांपूर्वी निवृत्त झाले. त्यांनी ज्या मुलाला शिकवलं त्या मुलाच्या वेल्डिंगच्या वर्कशॉपमध्ये काम करतात. हा मुद्दा आहे”, असं संबंधित शिक्षक म्हणाला.
“माझा एक धामणगाव रेल्वेचा मित्र आहे. त्याला मी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी फोन केला. त्याच्या बायकोने सांगितलं की, सर एक वर्षापूर्वी मृत पावले. मी त्या बाईसमोर काय बोलू? अरे तुम्ही उत्तर द्या, मी काय बोलू?” असा सवाल करत शिक्षकाने आक्रोश केला.
“त्याला एक रुपया नाही मिळाला. त्याने १७ वर्षे नोकरी केली. त्याच्याकडे काहीच नाही. त्याने 8 लाख रुपयाचं एक तोडकं-मोडकं घर घेतलं आहे. त्याला चार वर्षाची मुलगी आहे. आणि एक अकरा वर्षाची मुलगी आहे. पेन्शन का नको?”, असा प्रश्न शिक्षकाने उपस्थित केला.
“आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आमच्या हक्काचा प्रश्न आहे. आमच्या कुटुंबियांचा प्रश्न आहे. आता जर मी इथे हर्ट अटॅकने मेलो तर तुम्ही माझं घर पोसणार का की हे लोकं पोसणार आहेत?”, असा प्रश्न शिक्षकाने केला.
“आमचा हक्काचं आहे. आम्ही ज्यादिवशी नोकरीला लागलो त्यादिवशी आम्हाला माहिती होतं की, आम्हाला पेन्शन मिळणार आहे. म्हणून आम्ही पेन्शन स्वीकारली”, असं शिक्षक म्हणाला.
अमरावतीत चुरशीची लढत
दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय चुरशीची ठरली. भाजपचे उमेदवार रणजित पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या मतांमध्ये फार तफावत नाही. दोन्ही उमेदवारांच्या मतांमध्ये फार कमी अंतर आहे. त्यामुळे कोण जिंकेल याबाबत अतिशय उत्सुकता आहे. असं असताना अमरावतीमधील शिक्षकाचा जुन्या पेन्शन योजनेवर बोलताना रडातानाचा व्हिडीओ समोर आलाय.