1 लाख जण अंगावर आले तर काय कराल? राज ठाकरेंचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा, ठाकरे सरकारला कडक सवाल
चार-चार महिने पगाराशिवाय राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मासारखी अरेरावाची भाषा योग्य नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अधिकृत बोलावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
नाशिकः चार-चार महिने पगाराशिवाय राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मासारखी अरेरावाची भाषा योग्य नाही. जोपर्यंत एसटीतला भ्रष्टाचार बंद होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) अधिकृत बोलावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले. यावेळी त्यांनी साऱ्या विषयावर आपले मत व्यक्त केले. मात्र, महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होणार का, या प्रश्नाला सोयीस्करपणे बगल दिली.
मॅनेजमेंट कंपनी काढा
राज म्हणाले, एसटीच्या संपाची मी माहिती घेतली आहे. सगळ्या संघटना बाजूला सारून हा संप सुरू आहे. लोकांसाठी राज्य असते. त्यांच्याशी अरेरावीची, कायद्याची भाषा बोलू नये. कर्मचाऱ्यांच्या मागण्या, प्रश्न समजावून घ्या. त्यांचे चार-चार महिने पगार नाहीत. दिवाळी पगाराविना गेली. अशात तुम्ही अरेरावीची भाषा करता. हे योग्य नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अधिकृत बोलावे, असे आवाहन त्यांनी केले. शिवाय खासगीकरण करण्याऐवजी एखादी मॅनेजमेंट कंपनी काढा. इकडे मात्र, तुम्ही एकही पाऊल उचल नाही. त्यांना वाऱ्यावर सोडून देऊन अरेरावाची भाषा करणे योग्य नाही. एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल, असा प्रश्न राज यांनी विचारला.
कोविडचे नियम अस्पष्ट
राज ठाकरे म्हणाले की, कोविडच्या नावाखाली यांना सूट, त्यांना नाही असे सुरू आहे. थिएटरमध्ये मास्क लावायचा नाही. एक खुर्ची मोकळी सोडायची. मग हेच नियम रेस्टॉरंटला लागू नाहीत. त्यामुळे थिएटरमध्ये मास्क लावल्यामुळे अनेकांचे प्रॉब्लेम झाले, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला. याप्रसंगी त्यांनी आचारसंहितेच्या नियम पालनाचा किस्सा सांगितला. 95 मध्ये निवडणूक आचारसंहिता आणली. तिचे नियमही लोकांना स्पष्ट माहित नव्हते. त्यामुळे एक कॅमेरावाला माझ्या मागे लागला. तेव्हा त्याला मी बाथरूमला चाललोय हे सांगावे लागले, असे म्हणताच पत्रकार परिषदेत खसखस पिकली.
चार-चार महिने पगाराशिवाय राहणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मासारखी अरेरावाची भाषा योग्य नाही. जोपर्यंत एसटीतला भ्रष्टाचार बंद होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अधिकृत बोलावे.
– राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
इतर बातम्याः