औरंगाबाद महापालिका निवडणुकीत पुन्हा खोडा, प्रभाग आराखडा नव्यानं सादर करा, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंच्या आणखी मागण्या काय?
सोशल मीडियावरील आराखडा आणि प्रसिद्ध झालेला आराखडा एकच आहे. त्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याचे उघड झाले आहे. असा आरोप करत संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.
औरंगाबादः राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (Maharashtra Municipal Election) प्रक्रियेला वेग आला आहे. मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या औरंगाबाद महापालिका (Aurangabad Municipal corporation) निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा आणि अधिसूचनाही जाहीर झाल्या आहेत. मात्र महापालिकेचा हा प्रारुप आराखडाच वादात सापडला आहे. शिवसेनेचा माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी या आराखड्यावर आक्षेप घेतला आहे. महापालिकेचा प्रारुप आराखडा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे गोपनीयतेचा भंग झाला असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचेही उल्लंघन झाले आहे. त्यामुळे हा आराखडा रद्द करून नव्याने आराखडा तयार करावा, अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. मुंबई येथे खैरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि यासंदर्भातील निवेदन सादर केले.
चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या मागण्या काय?
- गुगल अर्थच्या नकाशावर प्रगणक गटांच्या सीमारेषा हिरव्या रंगाने दर्शवाव्यात.
- प्रगणक गटांचे क्रमांक व त्या गटांची लोकसंख्या दर्शवावी.
- जनगणना प्रभागांच्या सीमा निळ्या रंगाने दर्शवाव्यात.
- नकाशावर शहरातील महत्त्वाची ठिकाणे रस्ते, नद्या नाले, रेल्वे लाइन त्यादी स्पष्टपणे दर्शवावे.
- नवीन निवडणूक प्रभागांच्या हद्दी लाल रंगाने दर्शवाव्यात. नकाशे हाताळता यावेत, यासाठी दोन किंवा तीन भागात तयार करावेत.
शिवसेना शहर प्रमुखांची नाराजी
महापालिकेच्या निवडणुकीसाठी केलेल्या प्रभाग रचनेविरोधात शिवसेनेच्या तिन्ही शहर प्रमुखांनी पक्ष सचिल अनिल देसाईंकडे तक्रार केल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून समजली. या आराखड्यात शिवसेनेचे नुकसान होईल, अशी भीती व्यक्त केली. आराखड्याचे काम सुरु होण्यापूर्वी पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी याबाबत काहीही माहिती कळवली नाही, तसेच पक्षाच्या हिताचा विचार केला नाही, अशी तक्रारही त्या पत्रातून व्यक्त केली असल्याची माहिती सू्त्रानी दिली आहे.
‘आराखडा व्हायरल प्रकरणी चौकशी व्हावी’
औरंगाबाद महापालिकेचा प्रभाग रचना आराखडा जाहीर होण्यापूर्वीच व्हायरल झाला. हा सोशल मीडियावरील आराखडा आणि प्रसिद्ध झालेला आराखडा एकच आहे. त्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याचे उघड झाले आहे. असा आरोप करत संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.