Aurangabad Crime : ‘त्या’ खवले मांजर चोरांचा जामीन नाकारला, हर्सूल कारागृहात रवानगी
अजिंठा वनपरिक्षेत्रात 12 ऑगस्ट रोजी हनवतखेटा फाट्याजवळ खवले मांजराची अवैध तस्करी करणाऱ्या तिघांना वनविभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतरही एक आरोपी पकडण्यात आला.
औरंगाबाद : जिल्ह्यातील अजिंठा वनपरिक्षेत्रात 12 ऑगस्ट रोजी हनवतखेटा फाट्याजवळ खवले मांजराची(Pangolin) अवैध तस्करी करणाऱ्या तिघांना वनविभागाने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतरही एक आरोपी पकडण्यात आला. या प्रकरणी या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांचा जामीन नामंजूर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या आरोपींची रवानगी औरंगाबाद शहरातील हर्सूलच्या मध्यवर्ती कारागृहात (Harsul Central Jail, Aurangabad) करण्यात आली आहे.
शिताफीने सापळा रचून रंगेहात पकडले
तीन महिन्यांपूर्वी वनविभागाने ही तस्करी पकडली होती. सोयगाव तालुक्यातील देव्हारी शिवारातील एका इसमाकडे खवले मांजर असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर उपवनसंरक्षक एस व्ही मंकावार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा उपवनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या नेतृत्वात एस डी चाथे यांच्या पथकाने खवले मांजराची तस्करी करताना तिघांना रंगेहाथ पकडले व एक जिवंत मांजर जप्त केले. तसेच त्यांच्याकडून शिकारीचे जाळे, पिंजरा, भाला तसेच मुद्देमालही जप्त केला.
खवले मांजराची तस्करी का होते?
खवले मांजर हा अंगावर खवले असलेला (पेंगोलिन) हा एकमेव प्राणी . त्याच्या अंगावरील वैशिष्ट्यपूर्ण खवले हेच याच्या शिकारी व तस्करीचे मुख्य कारण आहे. मांस व खवल्यांना विदेशात औषध म्हणून मोठी मागणी आहे परंतु त्यापासून तयार केलेल्या औषधांचा काहीही उपयोग होत नाही हे वास्तव आहे. केवळ ऐकीव गोष्टी व भ्रामक समज या कारणास्तव त्याची तस्करी होत आहे.
किटक खाऊन झाडांचे रक्षण करणारा प्राणी
खवले मांजर हा झाडांना लागलेली कीड ,मुंग्या ,वाळवी खाऊन झाडं वाचविणारा हा झाडांचा खरा सर्जन आहे. रोज सरासरी 10 ते 12 हजार वाळवी, मुंग्या ,कीटक,अळ्या, रातकिडे, कीटक खाऊन नैसर्गिक कीड नियमन हा प्राणी करतो. फळ व फुल झाडे जिथे अधिक तिथे मुंग्या व कीटक अधिक असतात, तिथे भक्ष्याच्या शोधात पेंगोलिन अधिवास करतो. याच्या संवर्धनासाठी ही जैवविविधता जपणेही तितकेच महत्त्वाचे.
शिकार केल्यास 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा
खवले मांजर ही लुप्त होणारी प्रजाती (endangered species) असून वन्यप्राणी (संरक्षण) अधिनियम 1972 चे अनुसूची क्र. 1 मधील अती संरक्षित वन्यप्राणी आहे. या वन्यप्राण्याची शिकार केल्यास 3 ते 7 वर्षा पर्यंत शिक्षा होऊ शकते, त्यामुळे कोणीही शिकार, तस्करी करून वन अपराध करू नये, असे आवाहन औरंगाबादचे उपवनसंरक्षक सूर्यकांत मंकावार यांनी केले. (4 gets judicial custody for trafficking Pangolin in Ajintha, Aurangabad, Maharashtra)
इतर बातम्याः