मोठी बातमीः औरंगबादेत जानेवारी महिन्यात अजिंठा महोत्सव! जगविख्यात लेणी परिसरात घुमणार सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूर!
अस्सल शास्त्रीय-सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देत वेरूळ-अजिंठ्याकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधणारा औरंगाबादचा वेरूळ महोत्सव बंद होऊन 5 वर्ष झालीत. आता ही मरगळ झटकण्याचं प्रशासनाने ठरवलं असून येत्या जानेवारी महिन्यात अजिंठा महोत्सव आयोजनाची तयारी सुरु आहे.
औरंगबाादः ऐतिहासिक लेण्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या औरंगाबादच्या वेरुळ महोत्सवात (Ellora Festival) 2017 पासून खंड पडलाय. त्यातच कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून पर्यटन क्षेत्राची अवस्था कोलमडल्यासारखी झाली आहे. पर्यटनाला आणि एकूणच ऐतिहासिक औरंगाबाद नगरीला उभारी देण्यासाठी यंदा जानेवारी महिन्यात भव्य अशा अजिंठा महोत्सवाचे (Ajanta Festival) आयोजन करण्यात येणार आहे. महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याविषयीच्या सूचना विभागीय आयुक्तालयातील बैठकीत दिल्या. तसेच पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन मिळण्यासाठी या महोत्सवाचे काटेकोरपणे नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिल्या.
बचतगटनिर्मित उत्पदनांचे ‘सरस’ प्रदर्शन
मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, हे वर्ष आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर अजिंठा लेणी परिसरात महिला समूहाच्या उत्पादनांचे सरस प्रदर्शनाचे आयोजन करावे. त्यासोबतच पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी लेणी परिसरात यंदा अजिंठा महोत्सव भरवण्यात यावा. या प्रदर्शनासह महोत्सवासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेने निधीसह परिपूर्ण नियोजन करून प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
…तर दरवर्षी आता अजिंठा महोत्सवच!
औरंगाबादच्या सांस्कृतिक ठेव्याची आठवण करून देणारा वेरूळ-अजिंठा महोत्सवाच्या परंपरेत 2017 नंतर खंड पडला होता. 2016 साली हा महोत्सव घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यात ब्रेक लागला होता. यंदाही वेरूळ-अजिंठा ऐवजी अजिंठा महोत्सवाचेच नियोजन केले जाणार आहे. विशेष म्हणजे हा महोत्सव यशस्वी झाला तर दरवर्षी अजिंठा महोत्सव घेतला जाईल, असे संकेतही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
इतर बातम्या-