Aurangabad | पैठणच्या आठवडी बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ, तब्बल 10 मोबाइलवर डल्ला!
बाजारात गर्दीचा फायदा घेत सातत्याने भुरटे चोर व पाकीटमार यांच्यामुळे नागरिकांना अनेकदा फटका बसतो. शुक्रवारी तब्बल दहा नागरिकांचे मोबाइल चोरी झाल्याने नागरिक संतापले आहेत.
औरंगाबादः पैठणच्या आठवडी बाजारात (Paithan Weekly Market) चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी भरलेल्या या बाजारातून नागरिकांचे दहा मोबाइल चोरीला (Theft of mobile) गेल्याने खळबळ उडाली. बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या मोबाइलवर अशा प्रकारे डल्ला मारल्यामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. भर दिवसा एकाच वेळी एवढ्या जणांचे मोबाइल चोरीला गेल्यामुळे हे चोर मुरलेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी (Police) वर्तवला आहे. ग्रामस्थांनी मात्र या प्रकाराचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. बाजाराच्या दिवशी पोलीस बंदोबस्त असावा, असी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.
महिलांची टोळी सक्रिय?
पैठण शहरातील आठवडी बाजारात खरेदीसाठी शहरातील महिला व पुरुषांची मोठी गर्दी होते. बाजारात गर्दीचा फायदा घेत सातत्याने भुरटे चोर व पाकीटमार यांच्यामुळे नागरिकांना अनेकदा फटका बसतो. शुक्रवारी तब्बल दहा नागरिकांचे मोबाइल चोरी झाल्याने नागरिक संतापले आहेत. विशेष म्हणजे दुपारनंतर बाजारातून मोबाइल चोरीला गेले असल्याचे पुढे आले आहे. मोबाइल चोरणारी महिलांची टोळी बाजारात सक्रिय असावी, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
पोलीस बाजारात आले अन्…
दुपारच्या वेळी बाजारातून मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी नागरिक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. शुक्रवारी नितीन जाधव, अंकुश सोळुंके, मच्छिंद्र मतकर, बाळासाहेब टेकाळे, शशिकांत वीसरे या नागरिकांनी बाजारातून मोबाइल चोरीला गेल्याचा अर्ज केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी एक पथक आठवडी बाजारात रवाना केले. त्यानंतर मात्र एकही मोबाइल चोरीला गेल्याचे समोर आले नाही. म्हणजेच पोलीस येताच चोरट्यांनी बाजारातून पळ काढला असावा.