विरोधात तक्रार केली म्हणून बाळच हिसकावलं, औरंगाबादेत तिच्या मदतीला धावून आलं दामिनी पथक!
कौटुंबिक वाद असह्य झाल्यामुळे पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करायला गेलेल्या प्राध्यापिकेचे दोन वर्षांचे बाळच हिसकावून घेतल्याचा प्रकार औरंगाबादेत घडला.
औरंगाबादः कौटुंबिक वाद असह्य झाल्यामुळे पतीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करायला गेलेल्या प्राध्यापिकेचे दोन वर्षांचे बाळच हिसकावून घेतल्याचा प्रकार औरंगाबादेत घडला. या अमानवी प्रकारामुळे व्याकुळ झालेल्या मातेने खूप विनवण्या करूनही तिचे बाळ तिला परत देण्यात आले नाही. अखेर शहरातील भरोसा सेल गाठत बाळ मिळवून देण्यासाठी मदत मागितील. त्यानुसार दामिनी पथकाने हस्तक्षेप करत सदर महिलेला धीर देत तिची आणि बाळाची भेट घडवून आणली.
घटना नेमकी काय?
मुकुंदवाडी परिसरातील उच्चशिक्षित दाम्पत्याच्या घरात घडलेला हा प्रकार. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेली सदर महिला आणि तिचा पती या दोहोंमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होते. वादाला कंटाळून प्राध्यापिकेने पतीच्या विरोधात भरोसा सेलकडे तक्रार दिली होती. या प्रकारामुळे संतापलेल्या पतीने दोन वर्षाचे बाळच महिलेकडून हिसकावून घेतले. अनेक दिवस मातेकडे बाळाला दिलेच नाही. गुरुवारी सदर महिलेने भरोसा सेलकडे या प्रकाराची माहिती दिली. मागील 20 दिवसापासून बाळाची आणि तिची भेट होऊ दिली नाही, ही माहिती कानावर घातली.
आईकडे रहायचे का बाबांकडे?
महिलेच्या तक्रारीनंतर दामिनी पथकाने गुरुवारी सायंकाळी संबंधित प्राध्यापिकेला पोलिसांनी पथकाच्या गाडीत बसवले. तिच्या पतीच्या घरी जाऊन पतीसह, इतर कुटुंबियांची समजूत घातली. कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. त्यानंतर पतीने ते दोन वर्षाचे बाळ आईकडे देण्यास होकार दिला. बाळ आणि आईची भेट घडवून आणण्याचा हा प्रसंग प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू निर्माण करून गेला. पोलिसांनी त्याला कोणासोबत रहायचे, असे विचारले असता, त्याने आईसोबतच असा इशारा करत थेट चप्पल घालून बाहेर पडला. यावेळी प्राध्यापक मातेला भावना अनावर झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
इतर बातम्या-