औरंगाबाद जिल्ह्याला 500 कोटी मिळावेत, पालकमंत्री सुभाष देसाई राज्य शासनाकडे मागणी करणार
जिल्हा नियोजन समितीने औरंगाबाद जिल्ह्यासाठी 2021-22 करिता 365 कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र कोरोनाची तिसरी लाट आली तर सगळा निधी त्यासाठीच खर्च होईल. म्हणून विकासकामांचा विचार करून 604 कोटी 23 रुपयांची मागणी सर्वपक्षीय आमदारांनी सोमवारी झालेल्या बैठकीत केली.
औरंगाबादः पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या उपस्थितीत औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला किमान 500 कोटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी वित्त व नियोजन विभागाकडे मागणी करणार असल्याचे सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जिल्हा नियोजन समितीने औरंगाबाद जिल्ह्यासाठी 2021-22 करिता 365 कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र कोरोनाची तिसरी लाट आली तर सगळा निधी त्यासाठीच खर्च होईल. म्हणून विकासकामांचा विचार करून 604 कोटी 23 रुपयांची मागणी सर्वपक्षीय आमदारांनी सोमवारी झालेल्या बैठकीत केली. ही मागणी शासनापुढे मांडण्याची तयारी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दाखवली.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिला कोरोनाचा आढावा
नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण म्हणाले, संभाव्य तिसऱ्या लाटेविरुद्ध लढण्यासाठी यंत्रणा तयार आहे. जिल्ह्यात 360 रुग्णवाहिका, 552 व्हेंटिलेटर बेड, 21 हजार 391 साधे बेड्स सज्ज आहेत. 25 पीएसए प्लँटच्या माध्यमातून 21 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. कोरोनामुळे जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना शासन मदतीसाठी 27,24 अर्ज आले आहेत. त्यापैकी 1941 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. शासनातर्फे मदतकार्यात राज्यात औरंगाबाद जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात किती निधी खर्च?
औरंगाबाद जिल्ह्याचा वार्षिक आराखडा 365 कोटींचा आहे. 3 जानेवारीपर्यंत 88.53 कोटी खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. 87 कोटी 95 लाख रुपये वितरीत झाले असून केवळ 61 कोटी 93 लाख खर्च झाले. हे प्रमाण केवळ 16.97 टक्के आहे. शेवटच्या तीन महिन्यात खर्च वाढू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
आमदार काय म्हणाले?
-आमदार प्रशांत बंब म्हणाले, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबादला निधी कमी मिळतो. तो वाढणे आवश्यक आहे. कोरोनासाठी वेगळा 150 कोटींचा निधी देऊन किमान 650 कोटींचा आराखडा तयार करावा. निधी कमतरतेमुळे ग्रामीण भागातील रस्ते, पाणी योजना तसेच विजेचे प्रश्न सोडवता येत नाहीत. – आमदार अतुल सावे म्हणाले, 500 कोटींपेक्षा अधिक निधी पाहिजे. पंतप्रधान आवास योजनेत 2016 पासून जागा उपलब्ध करून दिलेली नाही. पाणीपुरवठा योजनेचे काम संथ सुरु आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच संत तुकाराम नाट्यगृह सुरु करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
इतर बातम्या-