Aurangabad Omicron News: औरंगाबादकरांना तूर्त दिलासा, हॉटेल स्टाफ निगेटिव्ह, 7 दिवसांनी पुन्हा टेस्ट!
औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हॉटेलमधील स्टाफचे अहवाल काय येतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. हा अहवाल निगेटिव्हि आलाय, मात्र सात दिवस या कर्मचाऱ्यांनाही विलगीकरणात रहावे लागेल.
औरंगाबादः शहरात ओमिक्रॉन (Omicron) संशयित व्यक्ती शहरात ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, त्या हॉटेलच्या सर्व स्टाफची कोरोना चाचणी करण्यात आली. यात सर्वांचा अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आला. मात्र सात दिवसानंतर या सर्वांची पुन्हा एकदा चाचणी केली जाईल. तोपर्यंत त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवले जाणार आहे. तसेच ओमिक्रॉनच्या संशयित रुग्णाचे अहवालही आणखी दोन दिवसांनी येतील, तोपर्यंत शहराची चिंता कायम आहे.
ओमिक्रॉनचा संशयित रुग्ण आणि हॉटेलचा स्टाफ!
इंग्लंडहून आलेल्या औरंगाबादच्या कुटुंबातील युवती मुंबईत औमिक्रॉनग्रस्त आढळली. तिच्यावर तिथेच उपचार सुरु आहेत. त्यावेळी तिचे वडील चाचणीत निगेटिव्ह आले होते. ते तेथेच थांबले तर आई आणि बहीण हॉटेल सिल्व्हर इन मध्ये थांबले. मुलीचे वडील रविवारी शहरात आल्यावर तिघांची टेस्ट करण्यात आली, त्यावेळी वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे त्यांचे स्वॅब तातडीने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले. तिघांनाही मेल्ट्रॉन रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच हॉटेलच्या 20 जणांची सोमवारी RTPCR चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल मंगळवारी आला व यात हॉटेलचा पूर्ण स्टाफ निगेटिव्ह आढळून आला.
अजून चिंता संपली नाही!
हॉटेलचा स्टाफ निगेटिव्ह आला तरीही शहराला अजून पूर्णपणे दिलासा मिळाला नाही. सात दिवसानंतर या सर्वांची पुन्हा चाचणी केली जाईल. तोपर्यंत त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच ओमिक्रॉनग्रस्त तरुणीच्या वडिलांचा रिपोर्ट काय येतोय, हीदेखील चिंता आहे, आणखी दोन दिवसांनी त्यांचे अहवाल येतील, असे मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
शहारत 18 ठिकाणी मोफत RTPCR
शहरात 18 ठिकाणी मोफत आरटीपीसीआर चाचणीची सोय करण्यात आली आहे. सिडको एन-8, कबीनगर, कैसर कॉलनी येथील आरोग्य केंद्रात सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चाचणी केली जाते. तर रिलायन्स मॉलच्या मागे, घाटी, प्रोझोन मॉल, डीमार्ट शहानूरमियाँ दर्गा आणि हडको कॉर्नर, छावणी आरोग्य केंद्र, बेस्ट प्राइस-वीटखेडा, एन-2 कम्युनिटी याठिकाणी आरोग्य केंद्रात ही चाचणी केली जाते. तसेच मेल्ट्रॉन रुग्णालय, पदमपुरा कोव्हिड सेंटर, रेल्वेस्थानक आणि विमानतळावरही चाचणीची सुविधा मनपाने उपलब्ध करून दिली आहे.
इतर बातम्या-