डॉ. भागवत कराड यांचा ड्रीम प्रोजेक्ट, दौलताबाद किल्ल्यावरील रोप-वे बारगळणार, कुणी घेतला आक्षेप?
औरंगाबादमधील प्रसिद्ध दौलताबाद किल्ल्यावरील प्रस्तावित रोप वेचे काम सुरु होण्याआधीच बारगळण्याची चिन्ह आहेत. पुरातत्त्व विभागाने या प्रकल्पास आक्षेप घेतला आहे.
औरंगाबादः जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक देवगिरी अर्थात दौलताबाद (Daulatabad fort) किल्ल्यावरील रोप-वे सुरु करणे हा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांच्या अनेक ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. मात्र हा रोप वे सुरु होण्याआधीच अडचणीत सापडला आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला येथे रोप वे गरजेचा वाटत नसून त्यासाठी किल्ल्यावर योग्य जागा नाही. देवगिरीऐवजी अजिंठा लेणीत (Ajanta Caves) रोप ले उभारल्यास तो पर्यटकांसाठी सोयीचा ठरेल, असे एएसआयचे मत आहे.
काय अडचण आली?
भारतीय पुरातत्व खात्याचे अधीक्षण पुरातत्त्वविद डॉ. मिलनकुमार चावले म्हणाले, रोप वे मध्ये बसायला आणि उतरण्यासाठी दोन्ही ठिकाणी बेस स्टेशन तयार करावे लागते. यासाठी किल्ल्यावर 20 बाय 40 मीटर तर दुसऱ्या बाजूला 60 बाय 20 मीटरची जागा लागेल. बेस स्टेशनची उंची 20 मटरची असेल. बेस स्टेशन उभारण्यासाठी किल्ल्यावर सपाट जागा नसल्याने तोडफोड करावी लागेल. यासाठी पुरातत्त्व खाते परवानगी देणार नाही. तसेच दुसरे बेस स्टेशन कुठे उभारायचे, हाही प्रश्न आहेच. किल्ल्याच्या मागील जागेत दुसरे स्टेशन उभारण्याचा पर्याय होता. मात्र ती जागा पर्यटकांसाठी योग्य नाही. त्यामुळे रोप वे मुळे गर्दी वाढल्यास होणाऱ्या परिणामांनाही सामोरे जावे लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आता अजिंठा लेणीचा पर्याय
देवगिरी किल्ल्यावरील रोप वे चा डॉ. भागवत कराड यांचा ड्रीम प्रोजेक्ट तुर्तास तरी बारगळण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आता अजिंठा व्ह्यू पॉइंट ते लेणी असा रोप वे केल्यास पर्यटकांना फायदा होईल, अशी प्रतिक्रिया भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक पुरातत्त्वविद डॉ. मिलनकुमार चावले यांनी दिली.
इतर बातम्या-