Crime: मराठवाड्याला हादरवणाऱ्या तोंडोळी बलात्कारातील सातही आरोपींच्या मुसक्या आवळल्या, 10 दिवसात तपास पूर्ण, अन्य 13 गुन्हे उघड
मराठवाड्यातील विविध खेड्या-पाड्यांमध्ये चोरी, घरफोडी, दरोडेखोरीची प्रकरणे वाढली होती. त्यातच तोंडोळी येथील शेतवस्तीवर घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण मराठवाड्यात दहशत माजवली होती. त्यामुळे या संपूर्ण टोळीच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
औरंगाबादः अवघ्या मराठवाड्यातील ग्रामीण भागाला हादरवून सोडलेल्या 19 ऑक्टोबर रोजी पैठण तालुक्यातील तोंडोळी शेतवस्तीवर दरोडा (Tondoli Robbery) टाकून येथील महिलांवर सामुहिक बलात्कार करणारी टोळी औरंगाबाद पोलिसांनी अखेर जेरबंद केली आहे. मागील दहा दिवसांपासून या टोळीतील एकेका आरोपीच्या मुसक्या आवळत औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी (Aurangabad Police) या अट्टल दरोडोखोरांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या टोळीकडून मागील वर्षातील पाच आणि यंदाच्या आठ गुन्ह्यांची अशा एकूण 13 गुन्ह्यांची उकल करण्यातही पोलिसांना यश आले आहे. ग्रामीण पोलिसांनी दहा दिवसातच प्रचंड वेगाने तपासचक्रे फिरवत सर्वच दोषींना ताब्यात घेतले आहे.
आधी म्होरक्याला पकडले
तोंडोळी दरोड्याची घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या शेतवस्तीवरही असेच दरोडे पडल्याची माहिती उघड झाली होती. त्यामुळे आता या टोळीच्या सर्वच सदस्यांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. यासाठी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांसह इतर चार जिल्ह्यांतील पोलीस पथकेही कामाला लागली होती. आता या प्रकरणी सातही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे- प्रभू शामराव पवार (म्होरक्या), विजय प्रल्हाद जाधव, सोमनाथ बाबासाहेब राजपूत, नंदू भागिनाथ बोरसे, अनिल भाऊसाहेब राजपूत, किशोर अंबादास जाधव आणि ज्ञानेश्वर मुरलीधर जाधव.
पुरुषांना बांधून महिलांवर केले क्रूर कृत्य
बिडकीन परिसरातील तोंडोळी शिवारातील परप्रांतीय मजुरांच्या शेतवस्तीवर 19 ऑक्टोबरच्या मध्यरात्री सात दरोडेखोरांनी हैदोस घातला होता. दरोडेखोरांनी पुरुषांना बांधून दोन महिलांवर अत्याचार केले होते. शेतवस्तीवर झालेल्या या घटनेत दरोडेखोरांनी अत्यंत क्रूरपणे गुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे.
तोंडोळी दरोड्यापूर्वी केली होती रेकी
तोंडोळी दरोड्याप्रकरणातील सातही आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली असून त्यांनी यापूर्वीबी औरंगाबाद, पैठण, गंगापूर तालुक्यांतील विविध शेतवस्त्यांवर हैदोस घातला आहे. तोंडोळी आणि परिसरातील दरोडा, बलात्कार व जबरी चोरी करण्यापूर्वी या टोळीने रेकी केल्याची माहिती उघड झाली आहे. धक्कादायक म्हणजे, ज्या शेतवस्तीवर अत्याचाराचा प्रकार घडला, तेथील महिलांना आरोपींनी आधीच हेरून ठेवले होते. त्यामुळे नशा करून वस्तीवर गेल्यानंतर त्यातील तिघांनी अत्याचार केले अन् इतरांनी लूटमार केली.
पोलिसांनी आव्हान पेलले, इतर 13 गुन्हे उघड
गेल्या काही महिन्यांमध्ये मराठवाड्यातील विविध खेड्या-पाड्यांमध्ये चोरी, घरफोडी, दरोडेखोरीची प्रकरणे वाढली होती. त्यातच तोंडोळी येथील शेतवस्तीवर घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण मराठवाड्यात दहशत माजवली होती. त्यामुळे या संपूर्ण टोळीच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर हा तपास पूर्ण करण्यात पोलिसांना यश आले. पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर अधीक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, बिडकीनचे सहाय्यक निरीक्षक संतोष माने यांच्या पथकाने या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला. एवढेच नव्हे तर यासोबतच इतर 13 गुन्ह्यांची कबूलीदेखील या दरोडेखोरांनी दिली. मागील दोन वर्षांत बिडकीन, पाचोड, चिकलठाणा, गंगापूर, विरगाव, एमआयडीसी सिडको, दौलताबाद आदी ठिकाणू एकूण 13 ठिकाणी केलेल्या गुन्ह्याची कबूली दरोडेखोरांनी दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी दिली. तोंडोळी प्रकरणाचा अत्यंत कसोशीने छडा लावणाऱ्या औरंगाबाद ग्रामीण पोलिसांवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
इतर बातम्या-
अतिक्रमणाच्या विळख्यातून पैठण गेटची मुक्तता, औरंगाबाद महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई