औरंगाबादः युरोलाइफ कंपनी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, 100 कंत्राटी कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले
कंपनीने मागील 15 दिवसांपासून सलाईनच्या बाटल्यांचे उत्पादन बंद केले. कामगारांना घरी बसवले. तसेच मागील दोन महिन्यांचे वेतनही दिले नाही. त्यामुळे थकीत वेतनासाठी कंपनीसमोर कामगारांनी ठिय्या आंदोलन केले
औरंगबादः शहरातील वाळूज एमआयडीसीतील (Waluj MIDC) युरोलाइफ हेल्थ केअर प्रा.लि. (Euro Life Health Care Pr. Ltd) कंपनीच्या कामगारांना ऐन दिवाळीत वेतनासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले आहे. कंपनीच्या जवळपास 100 कंत्राटी कामगारांचे दोन महिन्यांपासूनचे वेतन रखडले आहे. त्यामुळे शनिवारी कंपनीसमोर कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. थकीत वेतन देण्यासाठी कंपनी व्यवस्थापन व ठेकेदार टोलवाटोलवी करीत असल्याचा आरोप संतप्त कामगारांनी केला आहे.
कंपनीतील उत्पादन 15 दिवसांपासून बंद
वाळूज एमआयडीसीतील युरोलाइफ हेल्थकेअर प्रा.लि. कंपनीत सलाइन बाटल्यांचे उत्पादन करण्यात येते. या कंपनीत तीन ठेकेदारांमार्फत कंत्राटी कामगारांकडून काम करून घेतले जाते. अशा जवळपास 100 महिला व पुरुष कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन कामगारांना देण्यात आलेले नाही. तसेच मागील पंधरा दिवसांपूर्वी उत्पादन बंद करण्यात आल्याने कामगार घरीच बसून आहेत.
ऐन दिवाळीत आर्थिक संकट
कंपनीतील कर्मचाऱ्यांवर ऐन दिवाळीत आर्थिक संकट आले आहे. कंपनीने मागील 15 दिवसांपासून सलाईनच्या बाटल्यांचे उत्पादन बंद केले. कामगारांना घरी बसवले. तसेच मागील दोन महिन्यांचे वेतनही दिले नाही. त्यामुळे थकीत वेतनासाठी कंपनीसमोर कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. शनिवारी दुपारपर्यंत कंपनीने कंपनीसमोर आंदोलन करूनही ठेकेदारांनी वेतन न दिल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात युरोलाइफ कंपनीच्या एचआर विभागाशी संपर्क होऊ शकला नाही.
जायंट्स ग्रुपतर्फे हिंदी पंधरवड्यानिमित्त पुरस्कार वितरण
हिंदी पंधरवड्यानिमित्त शहरातील सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय हिंदी विभागातर्फे विविध स्पर्धा झाल्या. पुरस्कार समारंभ नुकताच झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पुष्पा गायकवाड, जायंट्सचे अध्यक्ष दिनेश गंगवाल, सचिव नरेंद्र पटेल, प्रकल्पप्रमुख डॉ. गुरुदत्त राजपूत, प्राचार्य डॉ. मकरंद पैठणकर उपस्थित होते. डॉ. पुष्पा गायकवाड यांना जायंट्सतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. गुरुदत्त राजपूत यांनी केले, तर आभार डॉ. स्वाती नाकील यांनी मानले. निबंधलेखन वरिष्ठ गटांमध्ये अनामिका वर्मा- प्रथम, दुर्गेश्वरी अंभोरे- द्वितीय, सोनाली गायकवाड- तृतीय, कनिष्ठमध्ये विशाखा उणे- प्रथम, नम्रता भारस्वाडकर- द्वितीय, गायत्री राजपूत- तृतीय, सुंदर हस्ताक्षर वरिष्ठ गटात सोनाली गायकवाड- प्रथम, शीतल दाभाडे- द्वितीय, अनामिका वर्मा- तृतीय, कनिष्ठ गटात विशाखा उणे- प्रथम, रसिका जोशीने द्वितीय क्रमांक पटकावला.
इतर बातम्या-