हजेरीपटावर सोमवारच्या सह्या रविवारीच केल्या, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचं बिंग फुटलं!
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके यांनी सोमवारी सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास बांधकाम, सिंचन, वित्त विभागांना अचानक भेट दिली. यावेळी 75 कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले.
औरंगाबादः सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीवर अनेक वर्षांपासून टीका केली जातेय. काही प्रामाणिक कर्मचारी वगळता इतरांचा कामाचा वेग आणि उत्साह यावर नेहमीच प्रश्नचिन्ह ठेवले जाते. औरंगाबादेत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मीना शेळके यांनी सोमवारी सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास बांधकाम, सिंचन, वित्त विभागांना अचानक भेट दिली. यावेळी 75 कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे काही कर्मचाऱ्यांनी तर सोमवारच्या तारखेवर रविवारीच सह्या केल्याचे दिसून आले.
हजर, गैरहजर कर्मचाऱ्यांची नोंदच नाही
शासकीय कार्यालयांचा पाच दिवसांचा आठवडा सुरु झाल्यापासून सकाळी कार्यालय उघडण्याची वेळ पावणे दहा अशी ठेवण्यात आली आहे. मात्र अनेक कर्मचारी साडे दहा वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. काहीजणांनी रजा लिहून हजेरीपटात ठेवल्या होत्या. मात्र कार्यालय प्रमुखांकडून त्या मंजूर झाल्या नव्हत्या. काहीजण दीर्घ रजेवर होते, पण त्यांच्या नोंदी मस्टरवर नव्हत्या.
कोणत्या विभागाचे किती कर्मचारी?
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके यांनी जिल्हा परिषद आवार, नारळीबाग, घाटी परिसरातील विभागांना भेट दिली. या झडतीत बांधकाम व वित्त विभागाचे सर्वाधिक 17 कर्मचारी गैरहजर होते. तर सिंचन विभागाचे 7, पंचायतचे 4, पशुसंवर्धन 1, स्वच्छ भारत मिळन 9, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा 3, ग्रामीण आरोग्य अभियानाचे 10 कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले.
अहवाल सीईओंना पाठवला
सकाळी साडे दहा वाजले तरी कर्मचारी कार्यालयात दिसून न आल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके यांनी नाराजी व्यक्त केली. नवीन इमारतीचे बांधकाम सुरु झाल्याने जिल्हा परिषदेतील बहुतांश विभाग स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कुणाचेच नियंत्रण नसल्यासारखे झाले आहे. या झडतीत गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आल्याचे शेळके यांनी सांगितले.
इतर बातम्या-