हा आहे पुरोगामी महाराष्ट्र? जातपंचायतीच्या धसक्याने दाम्पत्याने घेतले विष, पतीचा मृत्यू, उस्मानाबादेत भीषण घटना
जिल्हाधिकाऱ्यांसोबत याप्रकरणी नातेवाइकांशी चर्चा झाली आहे. जातपंचायतीच्या जाचावरून हा प्रकार घडला आहे. यातील आरोपी कोण आहेत याचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.
उस्मनाबाद: पुरोगामीत्वाचे ढोल बडवणाऱ्या महाराष्ट्राला वास्तवाचे दर्शन घडवणारी भीषण घटना मंगळवारी उस्मानाबादेत घडली. जिल्ह्यातील पारधी पेढीवर जातपंचायतीकडून (Jaat Panchayt)होणाऱ्या सततच्या छळामुळे काकानगर येथील दाम्पत्याने काही दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. या दाम्पत्यावर उपचार सुरु असताना मंगळवारी पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी या पतीचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर (District collector) नेला. तब्बल दीड ते दोन तास उस्मानाबादमध्ये (Osmanabad) या सर्व प्रकारामुळे तणावाचे वातावरण होते.
काय आहे नेमके प्रकरण?
उस्मानाबादमधील काकानगरमधील सोमनाथ छगन काळे (45) आणि अनिता सोमनाथ काळे (40) यांच्याविरोधात जातपंचायत बसवण्यात आली होती. सोमनाथ यांच्यावर अनैतिक संबंधाचा आरोप ठेवण्यात आला होता. यासाठी सांजा (ता. उस्मानाबाद) पेढी येथे 22 सप्टेंबरला ही पंचायत बसवण्यात आली होती. या आरोपामुळे पती-पत्नीला 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला होता. यातील 20 हजार रुपये वसूलदेखील करण्यात आले होते. मात्र उर्वरीत 1 लाख 80 हजार रुपयांसाठी या दाम्पत्यामागे जातपंचायतीने तगादा लावला होता. यामुळे या दाम्पत्याने वैतागून 24 सप्टेंबर रोजी विष प्राशन केले. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना पत्नी अनिता यांची प्रकृती सुधारली, मात्र सोमनाथ यांची प्रकृती ढासळली. 30 सप्टेंबरला त्यांना सोलापूरला हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान, त्यांचा मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.
शिक्षा एवढी भयंकर की आत्महत्येलाच कवटाळले…
काकानगर येथील जात पंचायतीचा धसका काळे दाम्पत्याने घेतला होता. ज्या दिवशी जातपंचायतीचे पंच सोमनाथ यांना घेऊन जाण्यासाठी येणार होते, त्या दिवशी ते प्रचंड तणावाखाली होते. पंच आणि पंचायतीची दहशतच एवढी होती की, शिक्षा भोगण्याऐवजी आत्महत्या बरी, असा निर्णय या दाम्पत्याने घेतला. त्यापूर्वी संबंधित पंचांच्या विरोधात तक्रारीही दाखल केल्या होत्या. जातपंचायतीकडून असे आरोप असलेल्यांना डोक्यावर 50 किलोचा दगड ठेवून मारहाण केली जाते, नग्न करुन काटेरी फोकाने मारतात, उकळत्या तेलात हात घालण्यास लावतात. गरम कुऱ्हाड 7 विड्याच्या पानांसह तळहातावर ठेवतात.
याआधीही भीतीपायी गाव सोडला
सोमनाथ काळे मूळ पळसप या गावी राहत होते. तेथे एका अपघाताच्या प्रकरणात जातपंचायतीच्या छळामुळे त्यांनी गाव सोडले होते. तेव्हापासून ते काकानगरला राहत हाेते. तेव्हाही जातपंचायतीच्या पंचांनी अनैतिक संबंधांचा आरोप लावून त्यांना दंड ठोठावला. पळसप येथे त्यांची सुमारे २० एकर शेती असल्याचेही नातेवाइकांनी सांगितले.
शववाहिनी नेली जिल्हाधिकाऱ्यांकडे, काही काळ तणाव
जातपंचायतीच्या धाकाने सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याने काळे यांचे नातेवाईक प्रचंड संतापले. त्यांनी मृतदेह असलेली शववाहिनी मंगळवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणलील. दुपारी 12 वाजेच्या सुमारास तेथे प्रचंड गोंधळ सुरु झाला. महिला नातेवाईकांनी तेथेच आक्रोश सुरु केला. त्यामुळे कार्यालयाचे दोन्ही गेट बंद करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक, तसेच दंगल नियंत्रक पथक दाखल झाले. बाराबलुतेदार संघटनेचे धनंजय शिंगाडेही तेथे आले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी नातेवाईकांची भेट घेऊन सदर प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच मृतदेह आणि नातेवाईकांना संरक्षण देत अंत्यसंस्कार पार पाडण्याच्या सूचना दिल्या.
आरोपीचा लवकरच शोध घेतला जाईल
जिल्हाधिकाऱ्यांसोबत याप्रकरणी नातेवाइकांशी चर्चा झाली आहे. जातपंचायतीच्या जाचावरून हा प्रकार घडला आहे. यातील आरोपी कोण आहेत याचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल. पोलिसांनाही आदेश देण्यात आले आहेत. -गणेश माळी, तहसीलदार, उस्मानाबाद.
इतर बातम्या-
पत्नीसोबत भांडण, जातपंचायतीचा नवऱ्यावर बहिष्कार टाकण्याचा आदेश, नंतर पतीकडे दोन लाखांची मागणी
MPSC करणाऱ्या तरुणीचा वडिलांच्या पार्थिवाला खांदा, बहिष्कार टाकणाऱ्या जात पंचायतीला 7 बहिणींची चपराक