मॉर्निंग वॉकला गेलेल्या डॉक्टरांना हार्ट अटॅक, ओळख न पटल्याने तीन दिवस मृतदेह बेवारस अवस्थेत, औरंगाबादची घटना!
सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या औरंगाबाद येथील ज्येष्ठ सर्जनला अचानक हार्ट अटॅक आला. पण सोबत ओळखपत्र किंवा मोबाइल नसल्याने त्यांचा मृतदेह 24 तास रस्त्यावर पडून होता. अखेर पोलिसांनी मृतदेह बेवारस म्हणून घाटी रुग्णालयात पाठवला. दरम्यान डॉक्टरांचा शोध घेणाऱ्या कुटुंबियांना तीन दिवसानंतर मृतदेह सापडला.
औरंगाबादः सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेले 60 वर्षीय डॉ. सुरेश टेकचंद रंगवाणी यांना चालतानाच हृदयविकाराचा झटका आला. परंतु सोबत मोबाइल किंवा ओळखपत्र नसल्याने 24 तास त्यांचा मृतदेह रस्त्यावरच पडून होता. दुसऱ्या दिवशी सातारा पोलिसांनी हा मृतदेह बेवारस म्हणून घाटीच्या शवागारात जमा केला, तर दुसरीकडे रंगवाणी कुटुंबियांकडून डॉक्टर बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जवाहरनगर पोलीस सतत तीन दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. सातारा आणि जवाहरनगर पोलीस स्टेशन या दोघांमधील अंतर फार तर तीन किलोमीटरचं आहे. मात्र दोन्ही पोलीस स्टेशनमधील समन्वयाच्या अभावामुळे डॉ. रंगवाणी यांचा मृतदेह बेवारस म्हणून शवागारात पडून होता.
सूतगिरणी चौकात राहत होते डॉक्टर
ज्येष्ठ सर्जन डॉ. रंगवाणी हे सूतगिरणी चौकातील प्राइड सिग्मा येथे राहत होते. 27 नोव्हेंबर रोजी ते सकाळी वॉकसाठी घराबाहेर पडले, परंतु नंतर ते घरी परतलेच नाहीत. एक दिवस पूर्ण शोधाशोध केल्यानंतर कुटुंबियांनी 28 नोव्हेंबर रोजी जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी शहर पोलिसांच्या ग्रुपवर ते बपत्ता असल्याची माहिती टाकली. तसेच शोधही सुरु केला. मात्र फिरायला आलेले डॉक्टर शुद्ध हरपल्याने 24 तास बीड बायपासवर तसेच पडून होते. अखेर 28 नोव्हेंबर रोजी सातारा पोलिसांना ही बातमी कळाल्यानंतर त्यांनी हा मृतदेह बेवारस घोषित करून घाटीत पाठवला.
मृतदेहाची ओळख न पटल्यास काय असते प्रक्रिया?
एखादा मृतदेह रस्त्यावर बेवारस अवस्थेत पडून राहिल्यास सदर ठिकाणाच्या पोलीस स्टेशनने इतर सर्व पोलीस ठाण्यापर्यंत त्याची माहिती कळवणे अपेक्षित असते. मात्र सातारा पोलीस स्टेशनने ही प्रक्रियाच पार पडाली नाही. त्यामुळे 29 नोव्हेंबरपर्यंत रंगवाणी कुटुंबीय व जवाहर पोलीस डॉक्टरांचा शोध घेत होते.
डॉ. रंगवाणींच्या कुटुंबियांचे पोलीस आयुक्तांना पत्र
दोन पोलीस स्टेशनमध्ये समन्वय नसल्याने डॉ. रंगवाणी यांच्या मृतदेहाची हेळसांड झाल्याने कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. रंगवाणींकडे ओळखपत्र नव्हते, मात्र ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दील मृतदेह आढळतो, त्यांनी त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्नही करू नयेत, हा बेजबाबदारपणा असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून सदर पोलिसांच्या कार्यशैलीत सुधारणा करण्याची विनंती करणारे पत्र कुटुंबियांनी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना पाठवले.
इतर बातम्या-