DRUGS: औरंगाबादेतही सूत्र हलली, नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त, स्थानिक पोलीस अॅक्शन मोडवर!
आर्यन खान ड्रग्स प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी एनसीबीचे छापे सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्येही पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांची विशेष बैठक घेतली. त्यानंतर पोलिसांनी ठिकठिकाणी छापे मारून नशेच्या गोळ्या आणि अवैध साहित्य जप्त केले.
औरंगाबादः राज्यभरात एनसीबीने (NCB) ड्रग्जविरोधात ठिकठिकाणी कारवाई करत असताना स्थानिक पोलीस दल नेमके काय करते, असा सवाल सर्वत्र विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता (Dr. Nikhil Gupta) यांनी बुधवारी शहरातील ठाणेदारांची चांगलीच कानउघडणी केली. त्यानंतर अचानक शहरातील पोलीस अचानक अॅक्टिव्ह झाल्याचे चित्र पहायला मिळाले. बेगमपुरा आणि सिटी चौक पोलिसांनी नशेच्या सहाशे गोळ्या जप्त केल्या. पोलिस आयुक्तांची बैठक संपल्यानंतर अवघ्या काही तासात आसेपिया कॉलनी आणि सादात नगरात संयुक्तपणे ही कारवाई करण्यात आली. तीन पुरुष व दोन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
446 नशेच्या गोळ्या जप्त
बेगमपुरा पोलीस आणि सिटी चौक पोलिसांनी खबरींकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेख नदीम शेख नईम हा नशेच्या गोळ्या घेऊन आल्याचे कळले. त्यांनी शासकीय पंचांना बोलावले. नदीमच्या घरी छापा मारला. तेथे शेख नीम शेख महबूब, शकिराबी शेख नईम यांच्याकडे नशेच्या 100 गोळ्या सापडल्या. तसेच येथील आरोपींची चौकशी केल्यानंतर सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नईमची बहीण समीनाच्या घरी छापा मारला. तिच्याकडून 346 गोळ्या जप्त करण्यात आल्या.
65 हजारांचा गांजा, 8 गोण्या गुटखा जप्त
आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर गुन्हे शाखाही जागी झाली. शास्त्री नगरमध्ये सचिन राजू ठोंबरेकडे गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांच्या मदतीने उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी छापेमारी करत ठोंबरेकडून 63 हजार 560 रुपयांचा गांजा जप्त केला. तसेच पोलिसांच्या अन्य एका पथकाने इनोव्हामधून आठ गोण्या भरून आणलेला गुटखा जप्त केला. तसेच नारेगावमधूनही 87 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.