सोशल मीडियावरील मैत्रीतून 21 लाखांचा गंडा, आंतरराष्ट्रीय भामट्याला औरंगाबाद सायबर पोलिसांनी दिल्लीत गाठले
या आरोपीच्या झडतीत त्याच्या नावे 40 एटीएम डेबिट कार्ड, विविध बँकांची 26 पासबुके, 74 चेकबुक, हिशोब ठेवण्यासाठी 4 नोटबुक, पॅनकार्ड, आधारकार्ड, 3 मोबाइल, 6 सिमकार्ड आणि इतर साहित्य मिळाले. हे साहित्य पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले.
औरंगाबादः आशिषकुमार भगवानदीप मौर्य नावाच्या सायबर गुन्हेगाराला पकडण्यात औरंगाबाद सायबर पोलिसांना (Aurangabad cyber police) यश आले आहे. मागील वर्षी दिवाळीच्या काळात एका महिलेला गिफ्ट पाठवून ते सोडवून घेण्याच्या नावाखाली सतत पैशांची मागणी करत या आरोपीने तब्बल 21 लाख रुपये लाटले होते. अखेर आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर सदर महिलेने सिडको पोलीसस्टेशनमध्ये (CIDCO Police Station) डिसेंबर महिन्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा तपास औरंगाबाद सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचे संपूर्ण धागे-दोरे सुटे करत दोन दिवसांपूर्वी या आरोपीला दिल्लीत जाऊन पकडले. या महिलेप्रमाणेच त्याने विदेशातील साथीदारांच्या मदतीने अनेक लोकांना फसवल्याचेही (Fraud) उघड झाले आहे.
आरोपीने असा घातला गंडा
सिडको एन-5 सह्याद्रीनगर येथील खासगी नोकरी करणाऱ्या 37 वर्षीय महिलेची मागच्या वर्षी ली चँग (अँड्रेसन) या विदेशी व्यक्तीसोबत ओळख झाली. त्याने जर्मनीहून बोलत असल्याचे सांगितले व व्हॉट्सअप नंबर दिला. दिवाळीनिमित्त त्याने महिलेला गिफ्टही पाठवले होते. गिफ्टचे फोटो व्हॉट्सअपवर पाठवले. त्यात मौल्यवान दागिने, बूट, मोबाइल आणि विदेशी चलन व इतर वस्तू असल्याचे सांगितले. तीन दिवसांनी महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधून पार्सल आल्याचे सांगितले. पार्सल सोडवण्यासाठी 30 हजार रुपये शुल्क भरावे लागेल असे सांगितले. 16 नोव्हेंबर 2020 रोजी महिलेने 30 हजार पाठविले. बाहेर देशातून पार्सल आल्यामुळे ते सोडवून घेण्यासाठी वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. त्यासाठी तुम्हाला विविध कागदपत्रे व शासकीय मान्यतेची आवश्यकता भासणार असल्याचे भामट्यांनी सांगितले. वेळोवेळी पैशांची माागणी करतच गेला. महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यात 21 लाख 50 हजार रुपये भरले. त्यानंतर डिसेंबरमध्ये महिलेने सिडको पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रार दाखल केली.
असा शोधला गुन्हेगाराला..
आशिषकुमारवर सोशल मीडियाद्वारे मैत्री करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सायबरचे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या टीमकडे हे प्रकरण सोपवले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे पथक दिल्लीत गेले होते. हा आरोपी दिल्लीतून महागडे गिफ्ट महिलेला पाठवत होता. त्यावरून पोलीस पथकाने त्याचे ठिकाण शोधले. 30 ऑक्टोबरला दिल्लीत गेलेल्या पथकाने सापळा रचला. मात्र आरोपीला चाहूल लागल्याने त्याने पळ काढला. पण त्याच ठिकाणी 2 किलोमीटर पाठलाग करत पथकाने त्याला पकडले. दिल्ली न्यायालयातून त्याचा ट्रॅझिट रिमांड घेऊन पथक काल औरंगाबादेत दाखल झाले.
फसवणुकीसाठीचे साहित्य पाहून पोलिसही आश्चर्यचकित
या आरोपीच्या झडतीत त्याच्या नावे 40 एटीएम डेबिट कार्ड, विविध बँकांची 26 पासबुके, 74 चेकबुक, हिशोब ठेवण्यासाठी 4 नोटबुक, पॅनकार्ड, आधारकार्ड, 3 मोबाइल, 6 सिमकार्ड आणि इतर साहित्य मिळाले. हे साहित्य पाहून पोलिसही आश्चर्यचकित झाले. तसेच आरोपीचे विदेशातही अनेक साथीदार असून त्यांच्या मदतीने देशातील अनेकांची फसवणूक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी दिली.
इतर बातम्या-