Aurangabad Crime: जनावरांची चोरी करून धुमाकुळ घालणारी टोळी बैलपोळ्याच्या दिवशी जेरबंद
याप्रकरणी औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या टोळीकडून 50,000 रुपये रोख, 28,000 रुपये किंमतीचे 3 मोबाइल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत.
औरंगाबाद: जालना आणि औरंगाबादमधील ग्रामीण भागात बैलांसारख्या जनावरांची चोरी करुन त्यांची मांसाकरिता विक्री करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या (Aurangabad crime branch team) पथकाला यश आले आहे. या टोळीकडून 50,000 रुपये रोख, 28,000 रुपये किंमतीचे 3 मोबाइल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जालना आणि औरंगाबादमधील ग्रामीण भागात जनावरे चोरीला गेल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. तेव्हापासून पोलिस या जनावर चोरांच्या मागावर होते. विशेष म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी ही कारवाई झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शिवारात उभ्या बैलांची केली तस्करी
करमाड पोलिस ठाण्यात भागवत साळुंके नामक तरुणाने ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी लालवाडी शिवारात बैलजोडी बांधली होती. या जोडीची 20,000 रुपये होती. तसेच त्यांच्या बाजूच्या शिवारात शेख अहेमद शेख महम्मद यांचीही 20,000 रुपये रुपये किंमतीची एक जोडी चोरीला गेल्याची फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्यांची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली असता गुप्त बातमीदारांकडून गुन्हेगारांची माहिती मिळाली.
कत्तल करण्यासाठी विक्री करत होते
सदर गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने जालन्यातून बब्बु सुलतान खान आणि शेख दादाभाई शेख उस्मान या दोघांना जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील मुडेगाव येथून ताब्यात घेतले. या आरोपींची अधिक चौकशी केली असता चोरलेले बैल अंबड येथील शेख जमील शेख रहीम याला विकल्याचे सांगितले. त्याने गुन्ह्याची कबूली दिल्यानंतर माजेद खाजा खान पठाण हा अंबडमधील इसम व त्याच्या साथीदारांच्या मदतीने जनावरांची वाहतूक करून, त्यांची कत्तल करून मांस विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर माजेद खाजा खान पठाण या अंबडमधील आणखी एकाला या गुन्हे प्रकरणी ताब्यात घेण्यात आले. आरोपींना पुढील तपासाकरिता करमाड पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान सदर आरोपींनी करमाड, पैठण आणि चिकलठाणा येथून जनावरे चोरण्याची कबूली दिली असून पोलिसांच्या या कारवाईमुळे जालना ते औरंगााद परिसरातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या दिवसी दिलासा मिळाला आहे.
इतर बातम्या-