पंकजा मुंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ, वैद्यनाथ साखर कारखान्याला ‘या’ तपायंत्रणेची नोटीस; काय आहे प्रकरण?
भाजप नेते पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवशक्ती यात्रा यशस्वी पार पडल्यानंतर पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणात कमबॅक करण्याची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या कारखान्याला नोटीस आली आहे.
बीड | 25 सप्टेंबर 2023 : शिवशक्ती यात्रा काढल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. या यात्रेच्या निमित्ताने त्यांनी काही जिल्हे पिंजून काढले. अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. या दरम्यान त्यांनी काही विधाने केली होती. आपल्याच पक्षाला सुनावणारी ती विधाने होती. खासकरून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंकजा यांनी आपल्याच पक्षाला चांगलं घेरलं होतं. त्यांच्या या शिवशक्ती यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे त्या महाराष्ट्रातील राजकारणात कमबॅक करतील असं सांगितलं जात होतं. या चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडे यांच्या अडचणी वाढवणारी एक घटना घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने सहा महिन्यांपूर्वी धाड टाकली होती. यावेळी जीएसटी विभागाने काही कागदपत्रे जप्त केली होती. हे कागदपत्र तपासले होते. यावेळी या कारखान्याने 19 कोटी रुपयांचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी नगर येथील जीएसटी आयुक्तालयाने पंकजा मुंडे यांच्या या कारखान्याला नोटीस बजावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
19 कोटी रुपयांचा कर बुडवला
याआधीही केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजी नगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वैद्यनाथ कारखान्याला जीएसटी कराबाबत नोटीसा दिल्या होत्या. या नोटिसींना उत्तर न दिल्याने सहा महिन्यांपूर्वी काही अधिकार्यांनी या कारखान्याला अचानक भेट देऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतले होते. त्यामध्ये या कारखान्याने बेकायदेशीररित्या 19 कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाल्याने शनिवारी कारखान्याला यासंदर्भात पुन्हा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता कारखान्याकडून त्यावर काय उत्तर दिलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मालमत्ता सील
दरम्यान, या आधीच युनियन बँकेने कारखान्याची मालमत्ता सील केली आहे. युनियन बँकेचे कारखान्यावर 1200 कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज न फेडल्याने बँकेने ही कारवाई केली आहे. बँकेची ही कारवाई ताजी असतानाच आता जीएसटी कार्यालय अधिक सक्रिय झाल्याने कारखान्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
म्हणून कारवाई झाली असेल
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला नोटीस आल्याने त्यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रमध्ये फिरल्या, त्यामुळे कारवाई सुरू झाली असेल असं मला वाटते, असा संशय बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.