मोठी बातमी ! संभाजीनगरमधील दंगलीत इम्तियाज जलील यांचा हात; शिवसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप
वीर सावरकरांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी केवळ इशारा दिला. आम्ही सहन करणार नाही म्हणाले. पण ठोस काहीच केलं नाही. केवळ पोकळ घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी सावरकरांना वंदन करण्यासाठी यावं. आम्ही स्वागत करू, असं शिरसाट म्हणाले.
संभाजीनगर : संभाजीनगरात दोन दिवसांपूर्वी राडा झाला. दोन गटात तुंबळ हाणामारी, दगडफेक झाली. यावेळी दोन्ही गटाकडून जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. या राड्यावरून राजकीय पक्षांमधून आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी तर संभाजीनगरमधील राड्यामागे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. संजय शिरसाट यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी मीडियाशी बोलताना हा आरोप केला आहे. किराडपुरा परिसरातील दंगल ही कोणी घडवून आणली हे सगळ्यांना माहिती आहे. इम्तियाज जलील हे रात्री किराडपुरा भागात का गेले होते? ही दंगल घडवून आणण्यात जलील यांचा हात आहे. इम्तियाज जलील यांनी हे सर्व घडवून आणले. इम्तियाज जलीलला लोकांनी वाचविले. जैसी करणी वैसी भरणी. इम्तियाजने ऐवढ्यातून सुद्धा मी तेथे होतो हे दाखविण्यासाठी शूट केले. इतर मुस्लिम नेते सुद्धा शहरात आहेत ते या दंगली संदर्भात का वक्तव्य करत नाहीत? असा सवाल संजय शिरसाट यांनी केला आहे.
आमचीही सावरकर यात्रा आहे
उद्या शहरात विरोधकांची सभा होत आहे आणि आमची सावरकर यात्रा सुद्धा होत आहे. त्यावेळेस इम्तियाज जलील आणि मी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात बसून राहतो त्यांची हिंमत आहे का? आताच पोलीस आयुक्तांची मी भेट घेतलेली आहे. या भेटीत शहरातील दंगल, उद्या होणारी महाविकास आघाडीची सभा आणि आमची स्वतंत्र वीर सावरकर गौरव यात्रा या सगळ्याच्या संदर्भात सविस्तरपणे आयुक्तांशी चर्चा केली आहे. शहरात शांतता प्रस्थापित करण्याकरता राजकारण्यांनीही पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे, असं शिरसाट म्हणाले.
सभा नको व्हायला हवी होती
महाविकास आघाडीची उद्याची सभा व्हायला नको होती. परंतु पोलिसांनी त्या सभेला परवानगी दिली. जर सभेला परवानगी नाकारली असती तर लोकशाहीचा गळा घोटला असा आरोप आमच्यावर झाला असता. त्यामुळे सरकारने ही परवानगी दिली. ही सभा रोखण्यात आम्हाला काहीच रस नाही. सभा होऊ द्या, सभेच्या बाबत काही बोलू नका, अशा आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून सूचना आहेत, असं सांगतानाच ज्या मैदानात बाळासाहेब ठाकरे सभा घेत होते, त्या मैदानात सभा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मदत घ्यावी लागत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
त्याच काँग्रेसला सोबत घेतलं जात आहे
शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाची ज्योत पेटवली होती. ती छोटी होती असं भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना प्रमुखांनी या मैदानावर जी सभा घेतली होती, ती छोटी होती.. असं भासवण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच आता हे मोठी सभा घेण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेना प्रमुखांनी याच मैदानावर काँग्रेसला गाडा, असं म्हटलं होतं. आता त्याच काँग्रेसला सोबत घेतला जात आहे. यांच्यावर गद्दारीचा शिक्का बसणार आहे, असं सांगतानाच उद्याच्या सभेला बाहेरू लोकं आणली जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी काळजी घ्यावी. सर्वांनी शातता राखावी, असं ते म्हणाले.
आम्हालाही धमक्या येतात
संजय राऊत यांना धमकी आली आहे. त्याची दखल सुद्धा घेतली आहे आणि एकाला अटक सुद्धा झाली आहे. धमकी देणारा हा माणूस मनोरुग्ण होता हे नंतर कळून येईल. आम्हाला देखील रोज धमक्या येतात आणि कॉमेंटमध्ये काही सुद्धा लिहितात. याला किती गांभीर्याने घ्यायच हे प्रत्येक राजकारण्याने ठरवावं. सुरक्षा ही काय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देत नाही. त्यासाठी एक समिती असते आणि ती समिती सुरक्षा पुरवत असते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.