Jalna | कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? रावसाहेब दानवेंच्या जालना शहरात चक्क पाकिस्तान गल्ली !! दोषींवर देशद्रोह लावण्याची मागणी
देशाचा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्तीला किंवा देशातील मुस्लिमांनादेखील आपल्या गल्लीचं नाव पाकिस्तान गल्ली असावं, असं वाटणार नाही, या प्रकरणाला जबाबदार कोण आहेत, याचा तातडीने तपास करा आणि संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी बबनराव लोणीकरांनी केली आहे.
जालनाः हिंदु-मुस्लिम, मंदिर-मशीद, भोंगे-हनुमान चालिसाच्या वादामुळे महाराष्ट्रातलं वातावरण संवेदनशील असतानाच जालन्यातून (Jalna) आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. देशावर दहशतवादी हल्ले घडवण्याचे कट ज्या देशात शिजतात, त्या पाकिस्तानचं (Pakistan Galli) नाव चक्क जालन्यातल्या एका गल्लीला देण्यात आल्याचं समोर आलं आहे. जालना जिल्ह्यातील परतून शहरात हा प्रकार उघडकीस आल्यानं खळबळ माजली आहे. नगरपरिषदेवरील सत्ताधारी काँग्रेस पक्षानं मुद्दाम हा खोडसाळपणा केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. हा अक्षम्य गुन्हा केल्याप्रकरणी संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी माजी मंत्री आणि विद्यमान भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. तसंच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवेंचा (Raosaheb Danve) मतदार संघ असलेल्या जालन्यात असा प्रकार कसा घडला, यावरून आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे.
कसा उघडकीस आला प्रकार?
जालना जिल्ह्यातील परतूर शहरात मालमत्ता कर आकारणीसाठी नुकताच एक सर्वे करण्यात आला. यात शहरातील अनेक मालमत्तांचं प्रत्यक्ष निरीक्षण करून संबंधितांना करांच्या नोटीसा देण्यात आल्या. या नोटीसांमुळे आधीच शहरात असंतोष असतानाच जुना मोंढा भागातील शनिमंदिर आणि प्रबुद्ध नगर येथील काही रहिवाशांना आलेल्या नोटिशीतला पत्ता पाहून धक्काच बसला. या नोटिशीवर चक्क पाकिस्तान गल्ली असा उल्लेख आढळून आला.
‘दोषींवर देशद्रोह लावा’
नगरपरिषदेकडून हा प्रकार दुर्लक्षाने झालाय की खोडसाळपणातून झालाय, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र यावरून जालन्यात राजकारण पेटलं आहे. माजी मंत्री आणि भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी नगरपरिषदेतील सत्ताधारी काँग्रेसवर यावरून जोरदार टीका केली आहे. मागील 25-30 वर्षांपासून नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी हा प्रकार मुद्दाम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. देशाचा अभिमान बाळगणाऱ्या व्यक्तीला किंवा देशातील मुस्लिमांनादेखील आपल्या गल्लीचं नाव पाकिस्तान गल्ली असावं, असं वाटणार नाही, या प्रकरणाला जबाबदार कोण आहेत, याचा तातडीने तपास करा आणि संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी बबनराव लोणीकरांनी केली आहे.