तृतीयपंथियांनी औरंगाबादेत अंगावर ओतले रॉकेल, त्रास देणाऱ्या गुरुवर कारवाई करा, अन्यथा इच्छामरण देण्याची मागणी
औरंगाबादमधील दहा ते बारा तृतीयपंथियांनी भरोसा सेल येथे जाऊन आंदोलन केले. आम्हाला त्रास देणाऱ्या गुरुवर कारवाई करा, अन्यथा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी केली.
औरंगाबादः मानसिक आणि शारीरीक त्रास देणाऱ्या तृतीय पंथीय गुरुच्या त्रासाला कंटाळून दहा ते पंधरा तृतीय पंथियांनी औरंगाबादच्या तक्रार निवारण केंद्रात ठिय्या मांडत गोंधळ केला. या गोंधळादरम्यान एका तृतीय पंथियाने अंगावर रॉकेल ओतून घेतले. केंद्रात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दामिनी पथकाच्या पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना बुधवारी सिल्लेखाना परिसरात घडली.
भरोसा सेलमध्ये तृतीयपंथियांचे आंदोलन
बुधवारी भरोसा सेल येथे गुरुकडून मानसिक व शारीरीक त्रास होत असल्याची तक्रार देण्यासाठी 10 ते 15 तृतीयपंथीय आले होते. त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. ठिय्या देत असतानाच एका तृतीय पंथियाने अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. महिला पोलिसांनी तत्काळ तृतीय पंथियास आडवले.
‘गुरुवर कारवाई करा, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या’
या आंदोलनात आलेल्या तृतीयपंथियांनी, त्यांना त्रास देणाऱ्या गुरुवर कारवाई करा, अन्यथा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी केली. आंदोलनात भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्यासह उस्मानपुरा येथील पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी मध्यस्थी करीत आंदोलकांची समजूत काढली. तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली.
इतर बातम्या-