Manoj Jarange-Patil : पिक्चर अभी बाकी है… मनोज जरांगे पाटील यांचा सभेपूर्वीच मोठा इशारा काय?
अंतरवली सराटी येथे आज मनोज जरांगे पाटील यांची मोठी सभा होणार आहे. या सभेला सात लाख लोक हजर राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. काल रात्रीपासून या सभेला मोठी गर्दी झाली आहे. सभेला महिलांची मोठी उपस्थिती आहे.
दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 14 ऑक्टोबर 2023 : जालन्यातील अंतरवली सराटी गावात भगव वादळ आलं आहे. अंतरवली सराटीत काल रात्रीपासूनच हजारो लोक एकवटले आहेत. दीडशे एकर मैदानावर बघावं तिकडे गर्दीच गर्दी दिसत आहे. आरक्षणासाठी मराठा समाजातील लोक या मैदानात एकवटले असून आरक्षणाबाबत सर्वांच्या भावना तीव्र आहेत. सभेला आलेले लोक आरक्षणाबाबत पोटतिडकीने भूमिका मांडत आहेत. तर, मनोज जरांगे पाटील आज काय बोलतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. जरांगे पाटील यांनी सभेला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे जरांगे पाटील सभेत काय बोलणार याचे संकेतच मिळत आहेत.
अंतरवली सराटीत जनप्रलयच आला आहे. मराठा समाज शांततेत आला आहे आणि शांतेत जाईल. आज दुपारी 12 वाजता सभेला सुरुवात होईल. देशाला आणि राज्याला मराठा समाज शांततेचा संदेश देणार आहे. आजपासून सरकारच्या हातात दहा दिवस आहेत. आम्हाला हक्काचं आरक्षण पाहिजे. ते सरकारला द्यावंच लागेल. सरकारने भावना शून्य होई नये, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
ही गर्दी नाही, वेदना आहे
ही गर्दी नाहीये. हा जमाव नाहीये. ही सभाही नाहीये. ही वेदना आहे. एका वेदनेतून लोक या ठिकाणी आले आहेत. स्वत:च्या लेकराचं भविष्य आणि अस्तित्व धोक्यात आलं आहे. एक टक्का हुकला तरी सुशिक्षित बेकार म्हणून मराठा तरुणाला घरात बसावं लागतंय. मग तो कितीही हुशार असला तरी त्याची संधी जाते. संधीच मिळत नसल्याने त्याचा नोकरीतील टक्का कमी झाला आहे. म्हणून मी सामान्य माणसाची लढाई लढत आहे. आजपासून दहा दिवस हातात आहे. दहा दिवसात आरक्षण द्यायचं आहे. हा सुवर्ण क्षण आहे. या क्षणाला साक्षीदार व्हायचं आहे. एकही मराठा घरी राहणार नाही. पण सरकारने भावना शून्य होऊ नये. त्यांनी दहा दिवसात आरक्षण द्यावं, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय.
1100 एकरवर पार्किंगची व्यवस्था
आजच्या सभेत मी सर्व उलगडा करणार आहे. वस्तुस्थिती मांडणार आहे. समाज मायबाप आहेत. आम्ही 1100 एकरवर पार्किंगची सोय केलीय. 170 एकर जागेवर सभा होत आहे. गैरसोय झाली तरी समाज नाराज होणार नाही. आमची वेदना एकच आहे. मुलांचं भविष्य अडचणीत येऊ नये, असंही त्यांनी सांगितलं.
भुजबळ यांचा विषय चिल्लर
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. या दोघांचाही जरांगे पाटील यांनी समाचार घेतला. दोन्ही एकाच बाजारातील आहेत. सदावर्ते आणि भुजबळ ते काय आहेत हे सर्वांना माहीत आहे. भुजबळांचा विषय चिल्लर झालाय. कुठेही काहीही बोलतात. वयाचा आणि त्यांचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे ते काहीही बरळत आहेत. कोटी हा शब्द आम्हाला माहीत नाही. तुम्हालाचा माहीत. म्हणूनच तुम्ही आत जाऊन बेसन खाऊन आलात, असा हल्लाच त्यांनी चढवला.