सरपंचाने स्वत:चीच कार पेट्रोल टाकून पेटवली, मराठा आंदोलकांवरील हल्ल्याने संताप अनावर; कुठे घडली घटना?
जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला झाल्यानंतर त्याचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. आंदोलकांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडत असून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
औरंगाबाद | 2 सप्टेंबर 2023 : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले आहेत. त्यातच या आंदोलकांवर गुन्हेही दाखल करण्यात आल्याने मराठा समाज अधिकच खवळला आहे. आज सकाळपासूनच राज्यभरात निदर्शने सुरू आहेत. कुठे टायर जाळले जात आहेत. तर कुठे बोंबाबोंब केली जात आहे. एका ठिकाणी तर काही आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून जोरदार निषेध नोंदवला आहे. मात्र, औरंगाबादमध्ये एका सरपंचाने अत्यंत टोकाचं पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबादमध्ये सकाळपासूनच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून जाळपोळ सुरू आहे. औरंगाबादच्या विविध भागात रस्त्यावर उतरून आंदोलक जोरदार आंदोलन करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात एका सरपंचांने तर या हल्ल्याचा निषेध म्हणून स्वत:ची कारच पेटवली आहे. मंगेश साबळे असं या सरपंचाचं नाव आहे. ते फुलंब्रीचे सरपंच आहेत. त्यांनी भररस्त्यात आपली कार आणली. त्यानंतर त्यावर स्वत:च्या हाताने पेट्रोल ओतलं आणि काडी लावून कार पेटवून दिली. यावेळी त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. त्यांच्या समर्थकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरपंच मंगेश साबळे यांचे टोकाचे पाऊल उचलल्याने या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
भाविकांचा खोळंबा
जालन्यातील घटनेचे सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये पडसाद उमटले. अक्कलकोटमध्ये सकल मराठा समाजाने सोलापूर अक्कलकोट महामार्गावर टायर जाळून निषेध नोंदवला. यावेळी मराठा कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. आंदोलकांनी भर रस्त्यावर टायर पेटवून ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांचा चांगलाच खोळंबा झाला.
पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
औरंगाबाद येथे काही आंदोलकांनी पाण्याच्या टाकीवर चढून जोरदार निदर्शने केली. झुंजार छावा संघटनेचे कार्यकर्ते चढले पाण्याच्या टाकीवर चढले आणि त्यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळता पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.
शरद पवार आणि उदयनराजे एकाच मंचावर
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार उदयनराजे भोसले आज जालन्यात आहेत. शरद पवार यांनी आधी अंबड येथील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांची चौकशी केल्यानंतर ते जालन्यात उपोषण स्थळी आले. या ठिकाणी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. या मंचावर उजयनराजे भोसेले आधीच येऊन बसले होते.
शरद पवारही तिथे आल्यानंतर एकच गलका झाला. दोन्ही नेते एकाच मंचावर होते. उदयनराजे मंचावर बसलेले होते. तर शरद पवार यांनी स्टेजच्या खाली खुर्चीवर बसले होते. यावेळी शरद पवार यांनी मनोज जरांडे पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कानात काही सांगितलं. यावेळी जयंत पाटील आणि राजेश टोपेही उपस्थित होते.