आधी अन्न त्याग, नंतर पाणी त्याग; मस्साजोगमधील ग्रामस्थांचा आर या पारचा इशारा
आवादा कंपनीने गावाच्या निर्णयात सहभाग नोंदवायला पाहिजे, आवादा कंपनीचे गोडाऊन इथे आल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यांनी केस दाखल केली, केस दाखल करून काय उपयोग नाही. प्रत्यक्ष गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे, अशी मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या बैठकीत करण्यात आली.

संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून बीडच्या मस्साजोगचे ग्रामस्थ पुन्हा एकदा एकवटले आहेत. कृष्णा आंधळेच्या अटकेसाठी या ग्रामस्थांनी करो या मरोचा इशारा दिला आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. लहान मुलं, वयोवृद्ध आणि सर्व गटातील लोकांसह महिलाही या आंदोलनात सामील होणार आहेत. दोन दिवस अन्न त्याग आंदोलन केलं जाईल. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर पाणी त्याग आंदोलन करण्याचा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे मस्साजोगचं आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज गावात बैठक घेतली. यावेळी अन्न त्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संतोष देशमुख प्रकरणात राज्य शासनावर आम्ही पूर्ण ग्रामस्थ नाराज आहोत. साधा एक आरोपी कृष्णा आंधळे सापडत नाही. लोकशाही काय फक्त आमच्यासाठीच आहे का? 107 चा गुन्हा दाखल झाला तरी पोलीस घरापर्यंत येतात, कड्या वाजवतात. राज्य शासनाला आमचे विनंती आहे हे प्रकरण गंभीरपणे घ्या, नाहीतर खूप मोठ्या परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशाराच या ग्रामस्थांनी दिला आहे.
एक इंचही हटणार नाही
या बैठकीत भाजपचे आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरही चर्चा झाली. आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना भेटले. संदीप भैया हे अजित दादांना भेटले. पण हे आंदोलन आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात करत आहोत. आम्ही गावकरी ठाम आहोत. कुणी कुठेही जावो, कुणालाही भेटो जोपर्यंत आमच्या सरपंचाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही एक इंचही मागे येणार नाही, असं या गावकऱ्यांनी बैठकीत ठरवलं आहे.
मागण्या
– PI महाजन आणि API राजेश पाटील यांना बडतर्फ करा.
– सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करा.
– सदर प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा,
– वाशीच्या PI ने आरोपींना मदत केली, त्यांना आतापर्यंत का आरोपी केलं नाही.
– 25 तारखेपर्यंत आम्ही गावकऱ्यांनी त्यांना मुदत दिली आहे, अन्यथा 25 तारखेला आंदोलन करू.
आम्ही गावकऱ्यांसोबत
यावेळी धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गावकऱ्यांनी विचारपूर्वक मागण्या केल्या आहेत. गावकऱ्यांच्या पुढे मी कधी जाणार नाही. बैठकीतील ज्या प्रमुख मागण्या होत्या, जे काही पुढचं आंदोलन सुरू राहणार आहे त्यावर सर्व गावकरी ठाम आहोत. अन्न त्यागाच्या आंदोलनात आम्ही सुद्धा सहभागी होणार आहोत, गावकरी जे करणार आहेत त्यात आमचा सहभाग 100% असणार आहे. पोलीस प्रशासनाने या ठिकाणी ढिसाळ कारभार केला होता, PI साहेबांनी रक्त बंबाळ झालेले माणसं मेडिकलला पाठवले आणि तिथून डायरेक्ट त्या गुंडांना घरी पाठवले. यांचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत, असं धनंजय देशमुख म्हणाले.