Video: अजिंठ्यातील सातकुंडात पडला मेडिकलचा विद्यार्थी, दीड तासांच्या अथक प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढले
एवढ्या खोल कुंडात पडल्यानंतर आपण जीवानिशी जाणार या भीतीने देवांशुचा थरकाप उडाला. मात्र फर्दापूर पोलिस आणि पुरातन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून बाहेर काढले.
औरंगाबाद: पावसामुळे हिरवेगार झालेले डोंगर आणि खळखळून वाहणाऱ्या धबधब्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी औरंगाबादमध्ये दुरवरून निसर्गप्रेमी येत असतात. अजिंठा लेणीतील (Ajintha Caves, Aurangabad) सातकुंड धबधबा तर पर्यटकांसाठी विशेष आकर्षण असतो. आज गुरुवारी इथे आलेल्या एका विद्यार्थ्याला पुरेशी काळजी न घेतल्याने मोठ्या कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागलं. सातकुंड पाहत असताना तो दुपारी कुंडात पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिस आणि पुरातन विभागानं अथक परिश्रम केले अखेर त्याला बाहेर काढण्यात आले. तब्बल दीड तास अथक प्रयत्न केल्यानंतर त्याला बाहेर काढले गेले. तीन वाजता सातकुंडात (Salkund waterfall) पडलेल्या विद्यार्थ्याला बाहेर काढायला साडे पाच वाजले. सातकुंड हे जंगल परिसरात असल्याने या संपूर्ण टीमला बाहेर यायला संध्याकाळ झाली होती. मात्र सामुहिक प्रयत्नांनी विद्यार्थ्याचे प्राण वाचल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होते.
जळगावचा वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सातकुंडात पडलेल्या या विद्यार्थ्याचे नाव देवांशु मौर्य असे आहे. 21 वर्षांचा हा विद्यार्थी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकतो. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अजिंठा लेणी परिसराचे सौंदर्य अधिकच बहरले आहे. देशभरातील पर्यटकांना या निसर्गाची भुरळ पडते. येथील सौंदर्य पाहण्यासाठी देवांशुदेखील आला होता. मात्र लेणी परिसरातील प्रसिद्ध असलेल्या सातकुंडात तो पडला. हे पाहून आजूबाजूच्या पर्यटकांनी त्याला वाचावण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळाने पोलिसांना पाचारण करण्यात आले.
दीड तासांच्या परिश्रमानंतर बाहेर काढले
सातकुंडात देवांशु पडला ती वेळ होती दुपारची ३ वाजताची. एवढ्या खोल कुंडात पडलेल्या देवांशुला बाहेर काढण्यासाठी मित्रांनीही मोठे प्रयत्न केले. अखेर फर्दापूर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिस आणि पुरातन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देवांशुला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. सुमारे दीड तास अथक परिश्रम केल्यानंतर देवांशुला बाहेर काढण्यास यश आले.
जवळून मृत्यू पाहिला- देवांशू
एवढ्या खोल कुंडात पडल्यानंतर आपण जीवानिशी जाणार या भीतीने देवांशुचा थरकाप उडाला. मात्र फर्दापूर पोलिस आणि पुरातन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून बाहेर काढले. दोरीला लटकून बाहेर येतानाही एक एक क्षण मोठा आव्हानात्मक होता, अशी प्रतिक्रिया देवांशुने दिली. दरम्यान देवांशुला सुखरूप बाहेर काढणाऱ्या संपूर्ण टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
इतर बातम्या-
मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरणार, विरोधासाठी मनसेनंही दंड थोपटले!