Aurangabad: कन्नड तालुक्यात गूढ आवाज, दारं-खिडक्या हादरली, तहसीलदार म्हणतात…
तालुक्यात कोठेही भूकंप मापक यंत्र नाही, तरी याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प शिवना टाकळी येथेही हे यंत्र नाही. हा भूकंप नसल्याचे स्पष्टीकरण तहसीलदारांनी दिले आहे.
औरंगाबादः सोमवारी पैठण येथील जायकवाडी धरण परिसरातून गूढ आवाज आल्याने औरंगाबादेत खळबळ माजली होती. त्यानंतर आता मंगळवारी असा प्रकार कन्नड तालुक्यात घडलाय. कन्नड शहरासह तालुक्यात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गूढ आवाज झाल्याने अनेक घरांची दारं-खिडक्या हादरले. त्यामुळे भूकंप होतोय की काय, अशी भीती नागरिकांना वाटली. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा सौम्य भूकंपाचा धक्का आहे, अशा चर्चाही सुरु झाल्या. मात्र हे आवाज कसले आहेत, याबाबत ठोस माहिती पुढे आलेली नाही.
दारं,खिडक्या, भांडीही हादरली
कन्नडमधील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गूढ आवाज आल्यानं अनेक घरांची दारं-खिडक्या हादरली. भांडीही जागची हलली. शासकीय कार्यालयांमध्येही हे हादरे जाणवले. अर्थात यामुळे कोणतीही वित्तहानी झाली नाही. पण अचानक असा आवाज येऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
तहसीलदार काय म्हणाले?
याबाबत तहसीलदार संजय वारकड म्हणाले, हा भूकंपाचा प्रकार नसून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तालुका प्रशासनदेखील याबाबत सतर्क आहे. तालुक्यात कोठेही भूकंप मापक यंत्र नाही, तरी याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प शिवना टाकळी येथेही हे यंत्र नाही. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे सिस्मोग्राफ यंत्र बसवलेले आहे. कन्नड तालुक्यातील गूढ आवाजाबाबत तेथील तज्ज्ञांशी बातचित केली असता, या यंत्रावर भूकंप झाल्याची नोंद नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच या काही भूगर्भीय हालचाली असू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
इतर बातम्या-