भाजपचे शर्थीचे प्रयत्न धुळीला, औरंगाबादमध्ये मविआचाच ‘विक्रम’, राष्ट्रवादीचा गुलाल उधळला
औरंगाबाद शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा (Aurangabad MLC Election) अंतिम निकाल अखेर जाहीर झालाय. महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे (Vikram Kale) यांच्या विजयाची अधिकृत घोषणा आता झालीय.
औरंगाबाद : औरंगाबाद शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा (Aurangabad MLC Election) अंतिम निकाल अखेर जाहीर झालाय. महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे (Vikram Kale) यांच्या विजयाची अधिकृत घोषणा आता झालीय. विक्रम काळे हे सकाळपासून आघाडीवर होते. अखेर या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला. विक्रम काळे यांनी या विजयातून चौख्यांदा विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. विक्रम काळे यांच्या या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष केला जातोय. या निवडणुकीत विक्रम काळे यांना 20 हजार 195 मतं मिळाली. तर भाजपचे किरण पाटील यांना 13 हजार 570 मतांवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे भाजपने औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या जागेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. पण तरीही भाजपच्या पदरात अपयश आलं आहे.
विक्रम काळे यांच्या मनात एक खंत
विक्रम काळे यांना विजय मिळाला असला तरी त्यांनी आपली नाराजी आज ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना व्यक्त केली. आपण गेल्या तीन टर्मपासून निवडून येतोय. ही आपली चौथी टर्म आहे. असं असताना आपल्याला मतमोजणीच्या पहिल्या फेरीत विजय मिळणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही, अशी खंत विक्रम काळे यांनी बोलून दाखवली.
विक्रम काळे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. आपल्याविरोधात पैसे देऊन उमेदवार उभे करण्यात आले, असा आरोप विक्रम काळे यांनी केला.
विक्रम काळे यांची नेमकी प्रतिक्रिया काय?
“निकाल असा अपेक्षित होता की आपण पहिल्या फेरीमध्येच विजयी होऊ. पहिल्या पसंतीच्या मतामध्ये विजयी होऊ. पण संघटना आणि भाजप दोघांना सारखी मतं मिळाली आहेत. त्यांच्यात फार तफावत वाटत नाही. त्यामुळे थोडीशी खंत वाटतेय”, अशी भावना विक्रम काळे यांनी व्यक्त केली.
“शेवटी जो जिता वही सिकंदर असतो. मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी आता दुसऱ्या पसंतीची मतं मोजावी लागत आहेत. त्यासाठी प्रोसेस सुरु झाली आहे. जे काही इतर उमेदवार आहेत त्यामध्ये मला दोन क्रमाकाची मतं मिळतील. मी कोटा पूर्ण करेन, असा मला आत्मविश्वास आहे”, असं विक्रम काळे म्हणाले.
‘भाजपने पैसे देवून उमेदवार उभे केले’
“मला हरवण्यासाठी भाजप व इतरांनी पैसे देऊन उमेदवार उभे केले मात्र माझा विजय निश्चित आहे”, असंदेखील विक्रम काळे यावेळी म्हणाले होते.
“मतांचं विभाजन झालं. जुनी पेन्शन योजना, शंभर टक्के विना अनुदान शाळांना अनुदान मिळवून देणे हे दोन महत्त्वाचे विषय होते. त्या मुद्द्यावरुन मतांचं विभाजन झालेलं दिसतंय’, असं विक्रम काळे यांनी सांगितलं होतं.
‘मी आनंदीच आहे, पण…’
“मी पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं, विक्रम काळे यांना टार्गेट करण्यासाठी सगळ्यांनी जाणीवपूर्वक उमेदवार उभे केलेले होते. त्यामध्ये अर्थपूर्ण उमेदवार उभे केले होते. त्यामुळे ते किती मतं घेणार याचा मला पहिल्या दिवसापासून अभ्यास होता. मी यावर लक्ष ठेवून माझ्या परिने काम करत होतो”, अशी प्रतिक्रिया काळे यांनी दिली.
“माझी विजयाकडे वाटचाल आहे. मी आनंदीच आहे. पण आता निकालापर्यंत वाट पाहणे जरुरीचं आहे. एक मुरलेला उमेदवार, तीन टर्मचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे अतिउत्साह किंवा उतावीळ होऊन चालत नाही. संयमाने सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. त्यामुळे मी संयमानेच वागतोय”, असं ते म्हणाले होते.