राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, आपल्याच पदाधिकाऱ्यांविरोधात टोकाचा निर्णय, थेट पक्षातून हकालपट्टी
राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नुकतंच नागपूर शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सतीश इटकेलवार (Satish Itkelwar) यांना निलंबीत केलंय. त्यानंतर आणखी एका अपक्ष उमेदवारावर कारवाई करण्यात आलीय.
औरंगाबाद : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या (Shikshak-Padvidhar Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना प्रचंड वेग आलाय. विधान परिषदेच्या दोन शिक्षक तर तीन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या 30 जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी काही ठिकाणी पक्षाच्या निर्णयाविरोधात काही पदाधिकाऱ्यांनी अर्ज दाखल केल्याचा प्रकार समोर आलाय. या सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. पण पक्षश्रेष्ठींनी आवाहन करुनही काही पदाधिकाऱ्यांनी आपला अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे संबंधित पक्षांकडून आता कारवाई केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नुकतंच नागपूर शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सतीश इटकेलवार (Satish Itkelwar) यांना निलंबीत केलंय. हेही असे की थोडके आता राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी एका अपक्ष उमेदवारावर कारवाई केलीय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नागपूर पाठोपाठ आता औरंगाबादमध्येही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पक्षादेश न ऐकल्यामुळे अपक्ष उमेदवार प्रदीप साळुंके यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. प्रदीप साळुंखे यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत पत्रक जारी करण्यात आलं आहे. या पत्रकात याबाबत सविस्तर पक्षाची भूमिका मांडण्यात आली आहे. तसेच प्रदीप साळुंके यांची पक्षातून हकालपट्टी केली जात असल्याचा स्पष्ट उल्लेख पत्रकात करण्यात आलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकात नेमकं काय म्हटलंय?
“औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विक्रम काळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे त्यांच्याकडून पक्षाने AA आणि BB दोन्ही फॉर्म भरुन घेतले आहेत. याशिवाय ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत”, असं पत्रकात म्हटलं आहे.
“असं असताना प्रदीप साळुंके यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारी विरोधात अर्ज भरला. तसेच त्यांनी तो अर्ज मागे घेतला नाही. विशेष म्हणजे त्यांना पक्षश्रेष्ठींकडून अर्ज मागे घेण्याच्या सूचना करण्यात आली होती. तरीही त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे”, अशी माहिती सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसची नागपुरातही कारवाई
दरम्यान, नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सतीश इटकेलवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण महाविकास आघाडीकडून या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराला अधिकृत पाठिंबा देण्यात आलाय. त्यामुळे सतीश इटकेलवार यांना अर्ज मागे घेण्याची सूचना करण्यात आली होती. पण इचकेलवार यांनी अर्ज मागे घेतला नाही. याउलट ते नॉट रिचेबल झाले. त्यामुळे त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली.