Aurangabad Health: मेल्ट्रॉन रुग्णालयात द्रवरुप ऑक्सिजन प्लांटचे साहित्य दाखल, आठवडाभरात उभा राहणार प्रकल्प
महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोव्हिड रुग्णालयात उभारला जाणारा द्रवरुप ऑक्सिजनचा प्लांट 20 किलो लीटरचा असेल. हवेतील ऑक्सिजनच्या तुलनेत लिक्विड ऑक्सिजनची गुणवत्ता अधिक असते.
औरंगाबाद: शहरात महापालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या मेल्ट्रॉन कोव्हिड केअर सेंटरसाठी (Meltron Dedicated Covid Hospital Centre -DCHC) उभारल्या जाणाऱ्या लिक्विड ऑक्सिजन सेंटरच्या कामाला गती मिळाली आहे. मागील वर्षीच या द्रवरुप ऑक्सिजन प्लांटला मंजूरी मिळाली होती. शुक्रवारी यासंबंधीचे साहित्य रुग्णालय परिसरात दाखल झाले. आता हा प्लांट उभारण्याचे काम सुरु झाले असून लवकरच तो कार्यान्वित केला जाईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने शहरात ऑक्सिजन कमी पडू नये, यासाठी महापालिका आणि राज्य सरकार या दोहोंकडून प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत. त्याअंतर्गतच हा प्लांट उभारला जात आहे. तसेच औरंगाबाद शहरात वैद्यकीय महाविद्यालय घाटी, मिनी घाटी आणि गरवारे परिसरात आणखी तीन लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभे राहणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
नवा प्लांट 20 किलो लीटरचा
महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोव्हिड रुग्णालयात उभारला जाणारा द्रवरुप ऑक्सिजनचा प्लांट 20 किलो लीटरचा असेल. या प्लांटला मंजूरी मिळण्यासाठी जवळपास वर्षभराचा कालावधी लागला. हवेतील ऑक्सिजनच्या तुलनेत लिक्विड ऑक्सिजनची गुणवत्ता अधिक असते. त्यामुळे महापालिका लिक्विड ऑक्सिजनला प्राधान्य देणार आहे. यापूर्वीही महापालिकेचे दोन लिक्विड प्लांट आहेत. हा प्लांट पूर्ण झाल्यानंतर महापालिकेचे एकूण तीन लिक्विड प्लांट असतील.
शहराच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर चाचणी
औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने 20 मार्च 2021 पासून खबरदारीचा उपाय म्हणून अन्य जिल्ह्यांतून अथवा बाहेरून शहरात येणाऱ्या नागरिकांची शहरातील प्रवेशद्वारावरच अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. काल तीन सप्टेंबर रोजी शहराचत्या सहा प्रवेशद्वारावर एकूण 97 जणांची कोरोना अँटीजन चाचणी करण्यात आली. चिकलठाणा, हर्सूल टी पॉइंट, कांचनवाडी, झाल्टा फाटा, नगर नाका, दौलताबाद टी पॉइंट येथे एकूण 49 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.
शुक्रवारी शहरात 2, तर ग्रामीणमध्ये 16 रुग्णांची भर
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात काल एकूण 18 कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली. सध्या 220 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर 2 रुग्णांचा काल मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत 1 लाख 48 हजार 141 कोरोनाबाधित आढळून आले. तर त्यापैकी 1 लाख 44 हजार 385 रुग्ण बरे होऊन घरी परतले. शुक्रवारी घाटी रुग्णालयात ब्रिजवाडी येथील रहिवासी 70 वर्षीय महिला तसेच खुलताबाद येथील 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान आतापर्यंत 3 हजार 536 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी नोंद आहे. (New Liquid oxygen plant will start in next week in Aurangabad Meltron Hospital)
इतर बातम्या-