पहिले बाळ जन्माला आले, मुलगा की मुलगी कळेचना, औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात प्रसूती
बाळाची कॅरिओटायपिंग टेस्ट करण्यात आली आहे. त्याचा अहवाल लवकरच येईल. त्यानुसार या दाम्पत्याला फॉलोअपसाठी बोलावले जाईल. गर्भात बाळ तयार होताना, कधी कधी असे प्रकार घडतात, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
औरंगाबाद: शहरातील एका दाम्पत्याला लग्नानंतर दोन वर्षांनी बाळ झाले, मात्र रुग्णालयात जन्मलेले हे बाळ (New born Baby) मुलगा आहे की मुलगी, हे कोडं डॉक्टरांनाही पडलं आहे. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात (Ghati hospital, Aurangabad) या मातेची सिझेरियन पद्धतीने नुकतीच प्रसूती झाली. पहिल्याच बाळाच्या आगमनाने या दाम्पत्याचा आनंद ओसंडून वाहत होता. मात्र या बाळाच्या लिंगावरून झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
आई-बाबांच्या आनंदावर विरजण
औरंगाबाद शहरात राहणारे हे दाम्पत्य कंपनीत काम करून उदरनिर्वाह करते. लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना बाळाच्या येण्याची चाहूल लागली. पाहता पाहता गरोदरपणाचे 9 महिनेही उलटून गेले. घाटी रुग्णालयात सिझेरियन प्रसूती झाली. दाम्पत्याला प्रचंड आनंद झाला. मात्र काही वेळातच या आनंदाची जागा चिंतेने घेतली. या बाळामधील जन्मजात गुंतागुंतीमुळे तो मुलगा की मुलगी हे सांगणे डॉक्टरांनाही कठीण गेले. अखेर जेनेटिक तपासणीच्या अहवालानंतर तो मुलगा की मुलगी हे स्पष्ट होणार आहे.
तपासणी चाचणीसाठी संस्थांकडून आर्थिक मदत
या बाळाच्या जेनेटिक तपासणीसाठी आवश्यक 5 हजार रुपयांची रक्कमही या दाम्पत्याकडे नव्हती. तपासणीविनाच ते बाळाला घेऊन घाटीतून रवाना होत होते. ही बाब घाटीतील डॉक्टर, परिचारिकांना कळली. त्यांनी सामाजिक संस्थांना याप्रकरणी मदतीचे आवाहन केले. के.के. ग्रुपचे अध्यक्ष अखिल अहमद, उपाध्यक्ष किशोर वाघमारे, सचिन शेख जुनेद, मोहम्मद आसिफ, आसिफ खान यांनी आर्थिक मदत केली. त्यानंतर एका लॅबच्या माध्यमातून कॅरिओटायपिंग टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल मुंबई येथून तीन दिवसात प्राप्त होणार आहे.
दुर्मिळ प्रकरणी अशी गुंतागुंत दिसते
प्रसूतीनंतर जन्मलेले बाळ मुलगा आहे की मुलगी हे कळायला कठीण जाण्याचे प्रकार फार दुर्मिळ असतात. या प्रकरणात हे दिसून आले. त्यामुळे बाळाची कॅरिओटायपिंग टेस्ट करण्यात आली आहे. त्याचा अहवाल लवकरच येईल. त्यानुसार या दाम्पत्याला फॉलोअपसाठी बोलावले जाईल. गर्भात बाळ तयार होताना, कधी कधी असे प्रकार घडतात, अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या प्रसूतीशास्त्र विभागातील डॉ. सोनाली देशपांडे यांनी दिली.
इतर बातम्या-