अबब! पैठणमध्ये आली मृत महाकाय मगर, वजन एक टन! धष्टपुष्ट मगरीचा असा मृत्यू का?
जायकवाडी धरण क्षेत्रात अनेक मगरींचे वास्तव्य असून या परिसरातून काही वर्षांपूर्वी एका मगरीला पकडून तरुणांनी वन विभागाच्या ताब्यात दिले होते. त्यानंतरही जायकवाडीच्या पंपहाऊस लगत मगरीचे वास्तव्य असल्याचे आढळले आहे.
औरंगाबादः जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi dam) पाणलोट क्षेत्रात एक महाकाय मगर मृत आढळून आली. शेवगाव तालुक्यातील खानापूर गावात ही महाकाय मगर आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. खानापूरमधील पाणवठ्याजवळ आढळलेल्या या मगरीचं वजन तब्बल एक टन असून तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला असावा याचा प्रश्न परिसरातील गावकऱ्यांना आणि वनविभागालाही (Forest Department) पडला आहे. लवकरच या मगरीच्या मृत्यूचे गूढ उकलणार आहे. जायकवाडी धरण क्षेत्रातील खानापुरात आढळलेल्या या मगरीला आता पैठणमध्ये (Paithan) आणण्यात आले आहे.
संध्याकाळी मगरीला पैठणमध्ये आणलं
मंगळवारी दुपारी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील खानापूर गावात नागरिकांना दुपारी चार वाजेच्या सुमारास ही महाकाय मगर मृत अवस्थेत आढळून आली. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला दिली. वन विभागाच्या टीमने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर मगरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण शोधण्यासाठी तिला पैठणला आणले गेले. मंगळवारी संध्याकाळीच या मृत अवस्थेतील मगरीला पैठणमध्ये आणले गेले. आज तिचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे, अशी माहिती स्थानिक पत्रकार रमेश शेळके यांनी दिली.
वन अधिकारी काय म्हणाल्या?
जायकवाडी धरण क्षेत्रात अनेक मगरींचे वास्तव्य असून या परिसरातून काही वर्षांपूर्वी एका मगरीला पकडून तरुणांनी वन विभागाच्या ताब्यात दिले होते. त्यानंतरही जायकवाडीच्या पंपहाऊस लगत मगरीचे वास्तव्य असल्याचे आढळले आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी खानापूरला आढळलेल्या मृत मगरीचे पैठण येथील वनविभागातर्फे आज पोस्ट मॉर्टेम केले जाणार असल्याची माहिती वन अधिकारी रुपाली तोळसे यांनी दिली. त्यानंतरच मगरीच्या मृत्यूचे खरे कारण कळू शकेल.
इतर बातम्या-