Aurangabad: शिक्षण क्षेत्रात खळबळ, प्रसिद्ध अकॅडमीचे संचालक पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये!! बाजार मांडलेले सूत्रधार कोण?
आरोग्य विभागाच्या भऱतीपाठोपाठ म्हाडातील भरती परीक्षेचेही पेपर फुटले असून या रॅकेटमध्ये औरंगाबादच्या प्रसिद्ध कोचिंग क्लासेसच्या संचालकांची नावं आली आहेत. रविवारी या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर औरंगाबादच्या स्पर्धा परीक्षा आणि एकूणच शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे.
औरंगाबादः महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील कर्मचारी भरतीनंतर म्हाडाच्या कर्मचारी भरती परीक्षेतील पेपर फुटीचे (Mhada Paper leak) रॅकेट रविवारी उघड झाले आणि औरंगाबादच्या शिक्षण (Aurangabad education) क्षेत्रात एकच खळबळ माजली. कारण राज्यात गाजत असलेल्या या दोन्ही प्रकरणात औरंगाबाद, बीड आणि जालना या मराठवाड्यातील सूत्रधार काम करत असल्याचे उघड झाले. म्हाडाच्या पेपरफुटीत औरंगाबादच्या स्पर्धा परीक्षांच्या (Competitive exam) मार्गदर्शनासाठी प्रसिद्ध असलेले गणिताचे प्राध्यापक अजय चव्हाण आणि सक्षम अकॅडमीचे (Saksham Academy) संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे हे प्रमुख सूत्रधार असल्याचे उघडकीस आले आहे. तर यापूर्वीच्या आरोग्य विभागाच्या पेपरफुटीत सातारा परिसरातील संदीप भुतेकर याचे नाव समोर आले असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, पालक आणि एकूणच शिक्षण क्षेत्राला मोठा हादरा बसल्याचे चित्र आहे.
सहा दिवसात दिवसात चार प्राध्यापकांची नावं
आरोग्य भरती घोटाळ्यात बीड बायपासवरील नवस्वराज्य पोलीस आणि सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीचा संदीप भुतेकर आरोग्य भरतीच्या घोटाळ्यात आरोपी म्हणून सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची क्रेझ वाढली असून यातील यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी क्लासेसचे संचालक परीक्षेच्या आधीच पेपर विकत घेत असल्याचेही उघड झाले आहे.
प्रीतीश देशमुख म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार
म्हाडाची परीक्षा घेण्याचे कंत्राट ज्या जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आले होते, त्याच कंपनीचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख हा पेपरफुटीमागील सूत्रधार असल्याचे रविवारी उघडकीस आले. देशमुखने नंतर औरंगाबादमधील दोन क्लासेसच्या तीन प्राध्यापकांनीच सर्वाधिक पेपरची मागणी केल्याचे सांगितले. हे लोक पाच ते सहा लाख रुपयांमध्ये पेपर विकत घेत असल्याचेही चौकशीअंती उघडकीस आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यामागे 60 ते 70 हजार रुपये मिळवत होते.
शिक्षणाचा बाजार मांडेलेले तिघे कोण?
म्हाडा पेपरफुटीत समोर आलेल्या नावांपैकी पहिला आरोपी म्हणजे अजय चव्हाण. मूळचा लोणारचा असलेल्या चव्हाणचे गणित आणि फिजिक्स विषयात शिक्षण आहे. टीव्ही सेंटर परिसरात द टार्गेट करिअर पॉइंट कोचिंग क्लासमध्ये तो गणिताची ट्यूशन घेतो. मास्टर ऑफ मॅथ असे त्याचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे आगामी 13 हजार पोलीस भरतीच्या पदांसाठी त्याने एक डिसेंबरपासून स्पेशन बॅचदेखील नियोजित केली होती. मागील चार वर्षात त्याच्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे तो खूप चर्चेत आला होता. पैठण गेट परिसरातील सक्षम एमपीएससी-यूपीएससी परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा अंकित चनखोरे व कृष्णा जाधवसोबत भागीदारीत क्लासेसही सुरु केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा नोकरीस असल्याने चनखोरेला त्याने सक्षम क्लासचा संचालक बनवल होते. तर आरोग्य भरती घोटाळ्यात नाव आलेला संदीप भुतेकर हा औरंगाबादच्या सातारा परिसरातील असल्याचे समोर आले आहे. भूतेकर 2019 मध्ये लष्करातून निवृत्त झाला. त्यानंतर त्याने साताऱ्यात नवस्वराज्य पोलीस व सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी सुरु केली. अल्पवाधीत लाखो रुपये कमावण्यासाठी त्याने आरोग्य विभागातील भरतीच्या वेळी 23 विद्यार्थ्यांना एकाच वेळी बोलावून परीक्षेतील प्रश्न वाचून दाखवले व उत्तरेही पाठ करून घेतली. मात्र हार्डकॉपी कुणालाही दिली नाही.
इतर बातम्या-